Fri, Jun 05, 2020 17:43
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › वर्षभर कावळ्यांना खाऊ घालणारा अवलिया (video)

वर्षभर कावळ्यांना खाऊ घालणारा अवलिया (video)

Published On: Sep 23 2019 7:20PM | Last Updated: Sep 23 2019 7:13PM

आण्णा भिवा जगताप  सटाणा : सुरेश बच्छाव

भाद्रपद महिन्यात पितृपक्षात पंधरवडाभर कावळ्यांना मानाचे स्थान प्राप्त होते. पितरांसाठी दिलेल्या नैवेद्याला काकस्पर्श होण्यासाठी सगळेच काकप्रतीक्षेत असतात. पितरांच्या निमित्ताने कावळ्यांना जेवू घालण्याच्या सामाजिक रिवाजामुळे अजूनही कावळ्यांचे मानवी जीवनातील महत्त्व अबाधित आहे. परंतु वर्षातून एखाद- दुसऱ्या दिवसासाठीच नव्हे तर वर्षभर कावळ्यांना रोजचे जेवण खाऊ घालणारा एक अवलिया बागलाण तालुक्यात आढळून आला आहे. 

तालुक्याच्या दुर्गम भागातील तळवाडे दिगर या गावातील आण्णा भिवा जगताप असे या अवलियाचे नाव आहे. छोट्याशा गावात असलेली छोटे चहा, पाववड्याचे हॉटेल आणि जमिनीच्या छोटयाशा तुकडयावर कुटूंब चालविणारे आण्णा वारकरी संप्रदायाच्या गावातील गगनगिरी महाराजांचे पट्टशिष्य आहेत. म्हणून स्वतःच्या मळ्यात त्यांनी महाराजांचे छोटेखानी मंदिरही बांधले आहे. दररोज सकाळी ते शेतात खास दर्शनासाठी जात असतात. त्यावेळी मात्र घरात राहिलेले रात्रीचे अन्न तसेच हॉटेलवर शिल्लक राहिलेले पाव, वडे आदी खाद्यपदार्थ ते सोबत नेतात. खास बाब म्हणजे शेतापासून अर्धा, एक किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचताच त्यांच्या मोटरसायकलच्या दोन्ही बाजूने कावळ्यांचा गराडा उडू लागतो. मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या डोक्याभोवती असंख्य कावळे काव- काव करत घिरटया घालू लागतात. 

देवदर्शन करून झाडाखाली बसताच ते सोबत आणलेली शिदोरी सोडतात. अर्थात तत्पूर्वीच त्यांच्या सभोवती शेकडो कावळ्यांनी गर्दी केलेली असते. आपल्या हाताने अन्नाचे बारिक तुकडे करून टाकू लागताच मोठ्या विश्वासाने एकेक कावळा जवळ येवून अन्नग्रहण करू लागतो. गेल्या अनेक वर्षापासून हा कायमचा परिपाठ झालेला आहे. साहजिकच यामुळे या सर्वच कावळ्यांना आण्णांचा आणि आण्णांना कावळ्यांचा पराकोटीचा लळा लागलेला आहे. त्यामुळे वर्षभरात एकही दिवस या नित्यक्रमात शक्यतो बदल होत नाही. आपल्या आयुष्याला घडविणार्‍या वाडवडिलांच्या नावाने वर्षातून एखाद-दोन दिवस कावळ्यांना खाऊ घालणाऱ्या जगात आण्णांचे मोल कावळ्यांसाठी नक्कीच आगळे-वेगळे असणार यात शंकाच नाही. 

आर्थिक बेताच्या परिस्थितीत संघर्ष करीत मुलांना उच्च शिक्षण देण्याची धडपड करताना दुसरीकडे शेकडो कावळ्यांचेही पोटच्या मुलांसारखे पालनपोषण करणाऱ्या आण्णा जगताप यांच्या या जगावेगळ्या अनोख्या दातृत्वाबाबत पितृपक्षानिमित्ताने हमखास चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.