Fri, Jul 10, 2020 08:28होमपेज › Nashik › मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघितलं म्हणून ही अवस्था : एकनाथ खडसे (video)

मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघितलं म्हणून ही अवस्था : एकनाथ खडसे (video)

Published On: Mar 06 2019 5:26PM | Last Updated: Mar 06 2019 7:23PM
जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघितलं आणि माझी ही अवस्था झाली असल्याचे सांगत माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

समस्त मुस्लिम समाज सावदातर्फे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी "एक शाम नाथाभाऊ के नाम" मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिल्याने माझी ही अवस्था झाली असल्याचे खडसे यांनी सांगितले. आपण जेव्हा मंत्रिपदावर होतो तेव्हा जाती धर्माच्या आधारावर नाही तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून कायमच मुस्लिम समाजाच्या पाठिशी उभं राहण्याचा प्रयत्न केला असेही ते यावेळी म्हणाले. 

मंत्रिपदाचे काही विशेष नाही चाळीस वर्षांच्या कालावधीत आपण अनेक मंत्रिपदे भूषवली असल्याचे खडसे म्हणाले. यावर एका मुस्लिम कार्यकर्त्याने आगामी काळात तुम्हालाच मुख्यमंत्री झालेले बघायला आवडेल असे मत व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या या म्हणण्याला उत्तर देताना 'मी मुख्यमंत्री पद मिळेल हे स्वप्न बघितल्यानेच आपली ही अवस्था झाली असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, भुसावळ नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, बोदवड नगराध्यक्ष सईद बागवान, भाजप संघटन सरचिटणीस प्रा. सुनीलजी नेवे या मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.