Tue, Nov 19, 2019 12:37होमपेज › Nashik › नंदुरबार : अठरा लाखाचा अवैद्य मद्यसाठा जप्त

नंदुरबार : अठरा लाखाचा अवैद्य मद्यसाठा जप्त

Published On: Jul 30 2019 5:34PM | Last Updated: Jul 30 2019 5:34PM
नंदुरबार : प्रतिनिधी

नवापुर हद्दीतील गुजरात राज्यालगत असलेल्या गडद व सागीपाडा ह्या अतिदुर्गम गावालगतच्या शेतांमध्ये छापा मारून अठरा लाखाचा अवैद्य मद्यसाठा जप्त करण्यात आला. नंदुरबार पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या गडद आणि सागी पाडा या दोन गावातील शेतांमध्ये अवैद्य मद्यसाठा करून ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार नंदुरबार पोलिसांचे पथक भर पावसात नदी, नाले, पार करुन गडद गावाच्या जंगलात पोहोचले. रस्त्यापासून २ ते ३ कि.मी. आडरस्त्याने पायी जात पोलिसांनी हे शेत शोधून काढले. एका संशयित ठिकाणी  छापा टाकला असता पोलिसांना सुमारे ७ लाख ५३ हजार ३६० रुपये किंमतीचा मद्यसाठा हाती लागला. हे शेत दिलीप शेगजी गावीत (रा. गडद, ता. नवापुर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. तर, गुजरात राज्यालगत जंगल परिसरात असलेल्या सागीपाडा भागात इलेश रतिलाल गावीत (रा. सागीपाडा) याच्या झोपडीच्या झाडाझडती १०,८८,६४० रुपये किंमतीचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. 

हा माल नेमका कोण पुरवठा करते या अनुशंगाने जागेवर मिळालेल्या मोबाईलच्या आधारे तपासणी केली असता एक गुजराती भाषेत युवकाने यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी संबंधितास नंदुरबार पोलीस ठाण्यात बोलावून विचारपुस केली असता त्यांची नावे किशोर पाटील व रवि गिरासे (रा. सेंदवा, मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले. या दोघा संबंधिताना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दोन्ही संशयित शेतमालक दिलीप शेगजी गावीत व इलेश रतिलाल गावीत हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत 

सदर ही कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहा. पोलिस निरिक्षक दिगंबर शिंपी, पोसई शिवाजी नागवे सह कृष्णा पवार, गुमानसिंग पाडवी आदी कर्मचाऱ्यांनी केली.