होमपेज › Nashik › शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून आठ उमेदवारांची माघार

माजी खासदार सोनवणेची मनधरणी करण्यात भाजप अयशस्वी

Published On: Jun 11 2018 8:41PM | Last Updated: Jun 11 2018 8:41PMनाशिक (उपनगर) : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून भाजपाचे बंडखोर उमेदवार माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांनी माघार घेण्यासाठी भाजपाचे पक्ष पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्नाना अपयश आले आहे. अर्ज माघार घेण्याचा आज, सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार न घेतल्याने आता सोळा उमेदवारांमध्ये थेट लढाई होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज, सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. यातील एकूण सहा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामध्ये महेश भिका शिरुडे (नाशिक), सुनील रमेश बाच्याव (मालेगाव), सुनील धोंडू फरस (मालेगाव), सुरेश पांडुरंग पाटील(जळगाव), दिनेश अभिमन्यू देवरे (नाशिक), प्रकाश हिला सोनावणे(नाशिक)  या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडेच्या उमेदवारीला अडचणी आल्यास दुसरा डमी उमेदवार म्हणून त्यांचे पुतणे कुणाल नरेंद्र दराडे आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेचे प्राचार्य गजानन खराटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर दराडे आणि खराटे यांनी छाननीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे आता पर्यंत आठ उमेदवारांनी माघार घेतली असून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

मनधरणी अयशस्वी 

भाजपाच्या तिकिटावर एकदा खासदार आणि दोनदा आमदार राहिलेले भाजपाचे जेष्ठ नेते माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांसह मुख्यामत्र्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. माघारीची वेळ ठीक ३ वाजता असताना तीन वाजायला पंधरा मिनिटे कमी असताना भाजपाचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गीते, विजय साने ,लक्ष्मण सावजी हे प्रतापदादा सोनावणे यांच्यासोबत विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आले. विभागीय महसूल आयुक्तांच्या स्वीय सहायकाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी सोनवणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. 

त्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार अनिकेत विजय पाटील यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे ही महसूल आयुक्त कार्यालयात दाखल झाले. या दोघांमध्ये महसूल आयुक्त यांच्या स्वीय साहयकाच्या दालनात पाच मिनिटे चर्चा झाली. यावेळी  विजय नवल पाटील यांनी सोनावणे यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. 
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनींना सोनावणे यांना यासंबंधी विचारले असता खा सोनावणे यांनी आपण जनरल माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तर भाजपाचे पदाधिकारी माझे मित्र असून मुख्यमंत्रांचा आपल्याला  फोन आला होता. मात्र आपण पाऊस पाण्याच्या गप्पा मारल्या असल्याचेही ते म्हणाले

यांच्यात रंगणार सामना -

अनिकेत विजय पाटील (भाजपा)  ,भाऊसाहेब कचरे पाटील (टीडीएफ –निरगुडे बादशहा गट) , सुनील पांडुरंग पंडित(शिक्षक परिषद) ,अजितराव किसान दिवटे,अप्पासाहेब रामराव शिंदे  ,अशोक शंकर पाटील,दराडे किशोर भिकाजी(शिवसेना पुरस्कृत) , पटेकर रवींद्र भिवाजी,पाटील विलास शांताराम पाटील , पानसरे विठल रघुनाथ,प्रताप नारायणराव सोनवणे,बाबासाहेब संभाजी गांगुर्डे,बेडसे संदीप त्रंबकराव ( राष्ट्रवादी पुरस्कृत व टीडीएफ बोरस्ते-मोरे गट), भिरूड शाळीग्राम ज्ञानदेव (तिसरी टीडीएफ) ,महादेव साहेबराव चव्हाण,मुख्तार अ मो कासीम.