जळगाव : प्रतिनिधी
देशभरात काल, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र जळगावात एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम गावातील ग्रामपंचायत कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारूच्या नशेत चक्क एका बहाद्दराने झेंडा खाली उतरवत तो घेवून गेल्याची घटना घडली. मात्र ध्वजाचे रक्षण करण्यासाठी त्याठिकाणी कोणताही कर्मचारी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या मद्यपी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप ओंकार पाटील (रा. हनुमंतखेडेसीम, ता. एरंडोल) असे या युवकाचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण संपन्न झाले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गावातील रहिवाशी असलेला प्रदिप पाटील हा दारुच्या नशेत असताना त्याने ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय ध्वज उतरवून तो घेऊन गेला.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अर्चना खेतमाळीस व कासोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी जावून चौकशी केली. या प्रकरणी ग्रामसेवक गुणवंत देसले यांनी कासोदा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्याद वरून प्रदीप पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप पाटील पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.