Fri, Jun 05, 2020 05:05होमपेज › Nashik › विधानसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विधानसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:33AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम यासह इतर सोशल माध्यमांमधून केल्या जाणार्‍या प्रचाराचा खर्च उमेदवारांच्या प्रचार खर्चात धरला जाणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची तयारी व आदर्श आचारसंहितेबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्‍त विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी खर्चातून मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल माध्यमांवरील प्रचार उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचे दर ठरविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात 75 हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. तर 56 हजार नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तुलना केल्यास जिल्ह्यात 19 हजार नवीन मतदारांची भर पडली. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या परिपूर्ण आहे. मतदानावेळी एखादे मशीन बंद पडल्यास पुढील 15 मिनिटांमध्ये ते बदलण्यात येईल, अशी माहिती मांढरे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांवेळी कार्यकर्ते व प्रचारासाठीच्या विविध वस्तूंच्या ठरविण्यात आलेल्या दरांबद्दल उमेदवारांनी नाराजी व्यक्‍त केली होती. त्यामुळे तो अनुभव गाठीशी असल्याने यंदा पिण्याच्या पाण्यापासून ते मंडपापर्यंत डिलक्स आणि नॉन-डिलक्स असे दोन विभाग करण्यात येतील. त्यानुसार वस्तूंचे दर ठरविण्यात येणार आहे, असे मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात 4,579 मतदान केंद्रे

जिल्ह्यात एकूण 4,446 मतदान केंद्रे असून, नवीन मतदारांची वाढलेली संख्या बघता 133 सहाय्यकारी मतदान केेंद्रे उभारण्यात येणार आहेत. 64 केंद्रे ही तात्पुरत्या स्वरूपात असतील. 196 पैकी 190 मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. लोकसभेसाठी 4,446 अधिक 274 सहाय्यकारी असे एकूण 4,720 मतदान केंद्रे होती. आयोगाने विधानसभेसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शनानुसार 141 मतदान केंद्रे कमी करण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत 60 संवेदनशील मतदान केंद्रे असून, त्याची संख्या 200 पर्यंत जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

निवडणूक काळात अवैधरीत्या मद्याची वाहतूक तसेच रोख रकमेची वाहतूक केली जाण्याची शक्यता गृहीत धरून 12 ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. या नाक्यांवर फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्‍तविश्‍वास नांगरे- पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरात मतदानयंत्रे ठेवण्यासाठी पाच स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून, तेथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. तसेच शहरातील 1,161 बूथवर 735 पोलीस कर्मचारी, 694 होमगार्ड व इतर पोलीस अधिकार्‍यांचा बंदोबस्त असेल. एमपीडीए कायद्यांतर्गत नऊ गुन्हेगारांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 93 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. अजूनही तडीपारीची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 4,171 जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ग्रामीण भागात सात तपासणी नाके तयार केल्याची माहिती दिली. 2,200 पोलीस कर्मचारी तसेच 1200 होमगार्ड्सची मदत घेण्यात येणार आहे. मालेगावमध्ये सीआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्या जातील, असेही वालावलकर यांनी स्पष्ट केले.