Wed, Jun 03, 2020 09:07होमपेज › Nashik › सेनेत आलबेल; राष्ट्रवादीत नाराजीनाट्य

सेनेत आलबेल; राष्ट्रवादीत नाराजीनाट्य

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:42PMसंदीप भोर

राजाभाऊ वाजे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने तुपे यांना संघटनात्मक काम फारसे कष्टप्रद नसले तरी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य दाखवावे लागणार आहे. दुसरीकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेले बाळासाहेब वाघ यांचा पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे संघटन कौशल्य दाखवताना येत्या काळात पक्षाला उभारी देण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

खरे तर शिवसेनेत सहा-सात महिन्यांपासून नूतन पदाधिकारी निवडीचे घोंगडे भिजत पडले होते. त्याला पक्षीय पातळीवरील काही कारणे असू शकतील. पण, आता या निवडीने शिवसैनिकांच्या जीवाची घालमेल एकदाची थांबली आहे. तालुकाप्रमुखपदाच्या शर्यतीत तुपे यांच्यासह विलास शिंदे, निमगाव-सिन्‍नरचे सरपंच बाळासाहेब सानप, नगरसेवक गोविंद लोखंडे, पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, माजी नगरसेवक किरण कोथमिरे अशी जवळपास आठ जणांची नावे होती. कट्टर तसेच निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुपे यांना या पदाच्या निमित्ताने न्याय मिळाला आहे. गेली पंचवीस-तीस वर्षे ते पक्षात सक्रिय आहेत.

1983 मध्ये त्यांनी बेलू गावात शाखा स्थापन केली. तेव्हापासून आजपर्यंत ते शिवसैनिक आहेत. गेल्या काही वर्षांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी अशा विविध निवडणुकांवेळी त्यांनी उमेदवारीसाठी वरिष्ठांना गळ घातली. मात्र, त्या-त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत त्यांना सबुरीचा सल्ला दिला गेला. बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत सोसायटी गटातून त्यांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली. पण पदरी निराशा आली. 25-30 वर्षांच्या काळात सिन्‍नरच्या राजकारणात आणि शिवसेनेत अनेक स्थित्यंतरे घडली. दिग्गज नेते आले आणि गेले. पण, तुपे यांच्यासारख्या मोजक्या कार्यकर्त्यांची पक्षावरील किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धा तसूभरही ढळली नाही. कदाचित तुपे यांनी वेळोवेळी दाखवलेला संयम आज त्यांना तालुकाप्रमुखपदाच्या निमित्ताने न्याय देऊन गेला, असे म्हणता येईल.

मावळते तालुकाप्रमुख दीपक खुळे यांची जिल्हा उपप्रमुखपदावर वर्णी लावण्यात आली आहे. योगायोग म्हणावा किंवा आणखी काही, खुळे यांच्या कार्यकाळात खर्‍या अर्थाने सिन्‍नर तालुक्यावर शिवसेनेचे अधिराज्य निर्माण झाले. राजाभाऊ वाजे यांची आमदारकी आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकला. विशेष म्हणजे मुसळगाव गटात त्यांच्या सौभाग्यवती वैशाली खुळे यादेखील जिल्हा परिषदेत गेल्या आहेत.

सिन्‍नर शहराध्यक्षपदासाठी गौरव घरटे यांच्याबरोबरच नगरसेवक बाळू उगले आणि पंकज मोरे यांचेही नाव चर्चेत होते. वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी कापल्याच्या कारणास्तव नाराज झालेले शहरप्रमुख राहुल बलक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या जागी प्रभारी म्हणून गौरव घरटे यांची  नियुक्‍ती करण्यात आली. सामाजिक समतोलाच्या द‍ृष्टीने घरटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी कायम करण्यात आली आहे. शहराकरिता एक आणि उपनगरांकरिता दुसरा असे दोन शहरप्रमुख नियुक्‍त करावेत, असाही मतप्रवाह होता. मात्र, आ. राजाभाऊ वाजे यांच्यासह वरिष्ठांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली नसल्याचे सांगण्यात येते.

दिलीप मुरकुटे यांच्या निमित्ताने शहर कार्यकारिणीत नव्या चेहर्‍याला संधी मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  उपस्थितीत   बाळासाहेब वाघ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेच्या नांदूरशिंगोटे गटातून निवडणूकही लढविली. मात्र, त्यांना अपयश आले. बाळासाहेबांचा राजकारणातला प्रवेश माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तंबूतला. पण गेल्या निवडणुकीत कोकाटे यांनी बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण शेळके यांचे सुपुत्र मंगेश शेळके यांच्या पारड्यात वजन टाकल्याने बाळासाहेबांनी तत्काळ राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातावर बांधले. त्यांच्यात मतविभागणी झाली आणि शिवसेनेच्या नीलेश केदार यांना सहज विजय मिळाला. राजकारणाच्या आखाड्यात वाघ महत्त्वाकांक्षी कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेले आहे. स्वभावात आक्रमकता आहे. त्यामुळेच कदाचित राष्ट्रवादीत आल्याबरोबर त्यांच्यावर पक्षाने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली असावी. 

वाघ यांच्याबरोबर नामदेव कोतवाल यांची शहराध्यक्षपदी, तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी कैलास झगडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या प्रती निष्ठा वाहिलेले कोतवाल यांनी यापूर्वीही शहराध्यक्षपद भूषविलेले आहे. झगडे हे कट्टर भुजबळ समर्थक आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ कारागृहात असले तरी त्यांच्या समर्थकांना पक्षात डावलले जाणे शक्य नाही. झगडे यांची निवड त्याचीच प्रचिती मानली जावी. राष्ट्रवादीनेदेखील कार्यकारिणी निवडताना सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. दरम्यान, पदाधिकारी निवडीच्या बैठकीत मावळते तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे आणि शहराध्यक्ष रवींद्र काकड यांचे नाराजीनाट्य रंगले.

वाघ यांच्यासह कोतवाल यांच्याही निवडीला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. तसे पाहता राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा वाहण्याची जबाबदारी सर्वाधिक लाभलेले तालुकाध्यक्ष म्हणून मुरकुटे गणले गेले आहेत. त्यांना दोन-पाच नव्हे, तर सात ते आठ वर्षे संधी मिळाली. काकड यांनादेखील साडेतीन वर्षे शहराध्यक्षपदावर काम करता आले. या काळात पक्षाचे संघटन आहे त्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारी दोहोंनी पेलली. पक्षाने टाकलेल्या विश्‍वासाला ते खरे उतरले आहेत. पण, ठरावीक अंतराने पक्षात असे फेरबदल होत असतात. नवनव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका पक्ष घेत असतो. असे करताना कार्यकर्त्याची क्षमता जोखून  निर्णय घेतले जातात. त्यामुळे लागलीच नाराजीचे काळे पडदे ओढून सगळेच अंधःकारमय झाल्यासारखे चित्र डोळ्यासमोर उभे करणे अयोग्य ठरावे.

 

Tags : nashik, nashik news, shivsena, ncp, Dispute,