Tue, Nov 19, 2019 05:47होमपेज › Nashik › सुरक्षारक्षकाकडून विनयभंग

सुरक्षारक्षकाकडून विनयभंग

Published On: Aug 31 2019 1:30AM | Last Updated: Aug 30 2019 11:13PM
नाशिक : प्रतिनिधी

शहरात पोलिसांचे निर्भया पथक कार्यरत असतानाही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांमध्ये विनयभंगांच्या दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलीसह शिक्षिकेचा समावेश आहे तर महाविद्यालयीन तरुणीच्या अपहरणाचाही प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठी नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला पिस्तूलचा धाक दाखवून धमकविण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेच्या डोंगरे वसतिगृह येथील महाविद्यालयात शिक्षिकेचा अश्‍लील व्हिडिओ काढणार्‍या कंत्राटी सुरक्षारक्षकाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिल पवार (25) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाइलच्या साह्याने अश्‍लील चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. संशयिताचा मोबाइल व्हायब्रेट झाल्याने शिक्षिकेने वर पाहिले असता पुरुषाचा हात आणि मोबाइल दिसला. शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. संशयित पवार पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला पकडले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्कूल बसचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

तेरा वर्षीय मुलगी शाळेतून घरी परत असताना स्कूल बसचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोरखनाथ मोतीलाल आहेर (49, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूल बसने घरी येत असताना आहेर यांनी पीडितेचा विनयभंग केला. हा प्रकार पीडितने घरी येऊन आईला सांगितला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या बहाण्याने अपहरणाचा प्रयत्न

जेलरोड येथे मैत्रिणीसोबत घरी जात असलेल्या महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून लग्नाच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या आजोबांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आकाश राजेंद्र मोरे ऊर्फ चंद्रमोरे (रा.पळसे) हा त्यांच्या नातीला काही दिवसांपासून त्रास देत होता.  
दोन दिवसांपूर्वी नात दुर्गा माता मंदिराजवळ आली असता संशयित आकाशने तिला रस्त्यात अडवून, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवून नेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कमरेला पिस्तूल लावत अश्‍लील चाळे

नववीतील मुलीच्या कमरेला पिस्तूल लावत अश्‍लील चाळे करत युवकाने विवाहाची मागणी घातली. नकार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगर परिसरात उघडकीस आला. शाळा सुटल्यावर पीडिता मैत्रिणीसमवेत घरी येत होती. त्याचवेळी संशयित नागशे रवि राठोड, तुषार चावरे व अन्य दोन साथीदारांनी तिचा रस्ता अडवला. त्यामुळे ती घाबरली आणि सुटका करण्याच्या प्रयत्नात पळू लागल्याने तुषारने पीडितेचा हात पकडून तिच्या कंबरेला पिस्तूल लावले. त्यानंतर विवाह करण्याची मागणी करत नकार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.