Tue, Nov 19, 2019 06:36होमपेज › Nashik › विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून  दिलीप खैरे यांच्या नावाची चर्चा

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून  दिलीप खैरे यांच्या नावाची चर्चा

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने भुजबळ यांचे निकटवर्तीय व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांना उमेदवारी दिल्याच्या चर्चेला रविवारी (दि.29) दिवसभर उधाण आले होते. सोशल मीडियावरही खैरे यांना शुभेच्छा देणारे संदेश फिरत होते. मात्र, ही निव्वळ चर्चा असल्याचे समोर येत आहे. खैरे हे उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी पक्षाकडून अद्याप कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा निर्णय झालेला नाही.

विधान परिषदेचा बिगुल वाजला असून, शिवसेनेने आघाडी घेत उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयंत जाधव हे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आ. जाधव यांना संधी देणार की नवा चेहरा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून संदीप गुळवे, अशोक सावंत हेदेखील इच्छुक आहेत. तर आ. जयंत जाधव यांनी अर्ज घेऊन तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.  रविवारी सकाळी राष्ट्रवादीने दिलीप खैरे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू झाली. दिवसभर राष्ट्रवादीशी संबंधित व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फेसबुक पेजवर खैरे यांना उमेदवारी दिल्याचे संदेश फिरत होते. उत्साही कार्यकर्ते सोशल मीडियावर खैरे यांना शुभेच्छाही देत होते. मात्र, याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. रविवारी पुणे येथे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर झाली. त्यासाठी नाशिकमधील सर्व महत्तवाचे नेते व पदाधिकारी हे पुण्याला गेले होते. त्यामुळे उमेदवारीबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे खैरे यांना उमेदवारी दिल्याची निव्वळ चर्चाच असल्याचे समोर आले.