Fri, May 29, 2020 08:30होमपेज › Nashik › आगाऊ कर भरणार्‍यांना सवलत योजना 

आगाऊ कर भरणार्‍यांना सवलत योजना 

Published On: Aug 30 2019 1:41AM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM
नाशिक : प्रतिनिधी

पुढील आर्थिक वर्षापासून मालमत्ता कराची रक्‍कम आगाऊ भरणारे तसेच इ-पेमेंटद्वारे कर भरणार्‍या मालमत्ताधारकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आला आहे. तत्कालीन आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मागील वर्षी ही सवलत बंद केली होती. त्यांच्या बदलीनंतर ही कर सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मनपा पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी केली होती. 

महापालिकेमार्फत ही कर सवलत योजना यापूर्वी सुरू होती. या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. मनपाच्या तिजोरीत कररूपी महसूल त्यामुळे जमा होत होता. मात्र, मुंढे यांनी ही योजना बंद केल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मागील वर्षी तसेच यावर्षीच्या मालमत्ता कर वसूल करताना जाणवला. यामुळे मनपा नगरसेवक, पदाधिकारी तसेच काही जागरुक नागरिकांनी कर रक्कम आगाऊ भरणार्‍यांना सूट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षापासून ही सवलत लागू करण्याचे निश्‍चित केले असून, तसा प्रस्ताव सादर केला आहे. मालमत्ता कर 1 एप्रिल व 1 ऑक्टोबर रोजी याप्रमाणे सहामाही हप्त्यांनी आगाऊ देय आहे. मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार जे मिळकतधारक भोगवटादार थकबाकीसह चालू मागणीतील दोन्ही सहामाहीची संपूर्ण रक्‍कम देयक मिळो अथवा न मिळो एक रकमी भरणा करतील अशा मिळकतधारकास चालू आर्थिक वर्षाचे चालू मागणीतील देयक सामान्य कर रक्‍कम भरतील त्यातून सूट प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात कर भरणा केल्यास त्यावर पाच टक्के, मे महिन्यात भरणा केल्यास तीन तर जून महिन्यात कर भरणा केल्यास संबंधितांना दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. सौर उर्जेचा वापर (सोलर एनर्जी) वापर आढळून आलेल्या मिळकतींना चालू आर्थिक वर्षाचे चालू मागणीतील देयक रकमेतून पाच टक्के सवलत सध्या दिली जात आहे. ही सवलत यापुढेही लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.      

ई-पेमेंटसाठी आणखी सवलत 

शहरातील नागरिकांना ऑनलाइन पेमेंट गेट वेचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, कराचा भरणा करण्यासाठी वेळेचा होणारा अपव्यय टाळणे व कॅशलेस ट्रांजेक्शन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यानुसार संपूर्ण थकबाकीसह मिळकत कर मिळकतीची रक्‍कम मनपाच्या मोबाइल अ‍ॅप किंवा संकेतस्थळावरील ऑनलाइन पेमेंट गेटवेचा वापर करून कराचा भरणा एक रकमी करतील अशा मिळकतधारक व भोगवटदारांना पाच टक्के सवलतीव्यतिरिक्‍त एक टक्‍का अधिक व जास्तीत जास्त एक हजारापर्यंत सवलत देण्यात येणार आहे.