Fri, Jun 05, 2020 17:48होमपेज › Nashik › डॉ. पवारांमुळे दिग्गजांची वाट झाली बिकट

डॉ. पवारांमुळे दिग्गजांची वाट झाली बिकट

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 25 2019 2:10AM
नाशिक : संदीप दुनबळे

स्वकियांनीच केलेला घात, हक्काच्या मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची वानवा यांसारख्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उणिवा भाजपाच्या डॉ. भारती पवार यांचा विजय सुकर करणार्‍या ठरल्या. हा विजय नुसताच त्यांचा स्वप्नपूर्ती करणारा ठरला असे नाही तर अपवाद वगळता सार्‍याच विधानसभा मतदारसंघांतून मताधिक्य मिळाल्याने माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ, स्वर्गीय आमदार ए.टी.पवार यांचे पुत्र नितीन पवार, माजी आमदार शिरीष कोतवाल या सार्‍यांचीच आगामी राजकीय वाटचाल बिकट करणारा ठरला आहे. 

दिंडोरी मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून, तो राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच कंबर कसली होती. त्यासाठी बारीकसारीक चुका टाळण्याचीही खबरदारी त्यांनी घेतली होती. सुरूवातीला डॉ. पवार यांना लोकसभेची तयारी करण्यास सांगितले पण, धनराज महाले यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देण्यात आल्याने डॉ. पवार अस्वस्थ झाल्या. अर्थात महाले यांना लगेचच उमेदवारी जाहीर केली गेली नसल्याने, त्या काही दिवस ङ्गवेट अ‍ॅण्ड वॉचफच्या भूमिकेत होत्या. अखेर महाले यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय डॉ. पवार यांना संसदेत पोहचविणारा ठरला. कारण, 2014 मध्ये मोदी लाटेतही डॉ. पवार यांनी राष्ट्रवादीकडून अडीच लाखांच्या दरम्यान मते घेऊन लढत दिली होती. उमेदवार बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या अंगलट आला हेच खरे. तसेच महाले यांचा अतिआत्मविश्‍वासही डॉ. पवार यांचा विजय सुकर करणारा ठरला. महाले हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार! त्यामुळे राष्ट्रवादीकडून खासदारकीची उमेदवारी लढताना शिवसेनेची छुपी मदत मिळेल, असा त्यांचा होरा होता. पण, कोणालाही विश्‍वासात न घेता, महाले यांनी राष्ट्रवादीत केलेला पक्षप्रवेश त्यांच्या समर्थकांना खटकणारा ठरला, आणि छुपी मदत मिळण्याची आशा धुळीस मिळाली. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ होमपीच असल्याने महाले यांना एक लाख 1,814 मते मिळाली. पण, हा अपवाद सोडला तर उर्वरित एकाही मतदारसंघात त्यांना डॉ. पवार यांच्यावर आघाडी घेता आली नाही.  लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात दस्तुरखुद्द भुजबळ यांचा येवला आणि त्यांचे पुत्र पंकज यांचा नांदगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ समाविष्ठ असल्याने या मतदारसंघातून महाले यांना मताधिक्य मिळेल, असा अंदाज होता.

प्रत्यक्षात नांदगाव मतदारसंघातून डॉ. पवार यांना तब्बल एक लाख 15,356 तर महाले यांना 40,425  एवढी मते मिळाली. या मतदारसंघातून आमदार होण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे सुहास कांदे आणि भाजपाच्या मनीषा आहेर यांनी घेतलेली मेहनत कामी आली तर पंकज यांचा प्रभाव निष्प्रभ ठरला, हे लपून राहिले नाही. एवढेच नाही तर काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर असो वा त्यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्य अश्‍विनी आहेर यांच्याही कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. येवला मतदार संघातूनही डॉ. पवार यांनी 95,709 मते घेत महाले नव्हे तर भुजबळ यांनाच धोबीपछाड दिली. कारण, महाले यांना 67,579  मते मिळाली आहेत. येवला आणि निफाड मतदारसंघाच्या बाँड्रीवर असलेल्या 40 -42 गावांचे राष्ट्रवादीचे नेते म्हणविणार्‍यांनी डॉ. पवार यांच्या मागे उघडपणे आपली ताकद उभी केली. निफाड तालुक्यात शिवसेनेचा आमदार असल्याने डॉ. पवार यांना मताधिक्य मिळणे स्वाभाविक आहे. पण, याच तालुक्यात माजी आमदार दिलीप बनकर यांचेही अस्तित्व असल्याने महाले यांनाही तुल्यबळ मते अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही. महाले यांना 58,019 तर डॉ. पवार यांना 93,763 मते मिळाली.  कळवण तालुक्यातून महाले आणि पवार यांना मिळालेल्या मतांमध्ये पाच हजारांचा फरक आहे. कळवण हे डॉ. पवार यांचे होमपीच आहे. त्यांचे दीर नितीन पवार हेही याच तालुक्यातून राष्ट्रवादीचे विधानसभेचे दावेदार मानले जातात. उमेदवारी मिळविण्यासाठी नितीन  पवार यांना महाले यांना मताधिक्य देणे भाग होते. तसा प्रयत्नही त्यांनी केल्याचे दिसून येत असले तरी डॉ. पवार यांना 65,545 तर महाले यांना 60,180 मते मिळाली आहे. चांदवड मतदारसंघात शिरीष कोतवालउत्तम भालेराव हे दोन माजी आमदार असतानाही महाले यांना अवघी 40,084 मते मिळाली.

या मतदासंघात भाजपाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी डॉ.पवार यांना तब्बल एक लाख 20,703 मते मिळवून दिली. म्हणजे, नात्याने व्याही असलेल्या  दोन माजी आमदारांंची ताकद कमी झाल्याचेच दिसून येते. विशेष म्हणजे कोतवाल हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, आमदार अनिल कदम यांची रणनीती डॉ. पवार यांच्या विजयाला हातभार लावणारी ठरली. त्यातच भाजपचे बुथपातळीवर संगठन मजबूत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने नेमका याचबाबतीत मार खालला. उमेदवारासोबत फिरायला कार्यकर्तेही नव्हते. नांदगाव मतदारसंघ तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गृहितच धरला. दुसरीकडे महाआघाडीत येण्यास इच्छुक असलेले परंतु, ऐनवेळी मतदारसंघ न सोडल्याने नाराज झालेले माकपाचे आमदार जिवा पांडू गावित यांनी तब्बल एक लाख 9,570 मते घेतली. त्यात भर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बापू बर्डे यांनीही 58, 847 मते घेतली.