होमपेज › Nashik › नववर्षात नाशिककरांना  डिजिटल सातबारा

नववर्षात नाशिककरांना  डिजिटल सातबारा

Last Updated: Dec 03 2019 10:43PM
नाशिक : प्रतिनिधी

नूतन वर्षापासून नाशिककरांना घरबसल्या 15 रुपयांमध्ये डिजिटल सातबारा उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 12 लाख 43 हजार 333 सातबार्‍यांपैकी 10 लाख 7 हजार 702 सातबार्‍यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सरकारी कामांसाठी हे डिजिटल सातबारे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सध्या डिजिटल सातबारा संगणकावर उपलब्ध असला तरी तो शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जात नाही. या उतार्‍यावरच ’ शासकीय कामांसाठी उतारा ग्राह्य धरला जाणार नाही’ असा उल्लेख आहे. नवीन वर्षांत देण्यात येणार्‍या डिजिटल सातबार्‍यावरील हा उल्लेख हटणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

सरकारी विभागांमध्ये अधिकधिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामांना गती देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षात करण्यात येत आहे. त्याअंतर्गतच शेतकरी व नागरिकांना घरबसल्या डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिजिटल स्वाक्षरी  केलेला सातबार्‍यावर स्वाक्षरीचा दिनांक, वेळ व ठिकाण असेल. डिजिटल स्वाक्षरीनंतर सातबार्‍यात काही बदल केल्यास त्याबाबतची माहितीदेखील उतार्‍यावर नमुद केली जाईल. प्रत्येक सातबार्‍याला 16 अंकी क्यूआर क्रमांक देण्यात आला आहे. त्याच्या सहाय्याने त्याची वैधता तपासता येईल. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने भूमि-अभिलेख विभागाच्या सहायाने डिजिटल सातबारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे उतारे सरकारी कामे व न्यायालयीन कामकाज व बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना त्याची मदत होणार आहे. त्यामुळे सातबार्‍यांसाठी शेतकरी व सर्वसामान्यांना तलाठी कार्यालयाचे मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. 

ऑनलाइन भरा शुल्क : जमाबंदी आयुक्तालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेमेंट गेटवेमार्फत शुल्क भरुन डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा नागरिकांना प्राप्त करता येईल. उतार्‍यात काही चुका असल्यास पोर्टलवरूनच तलाठ्यांकडे ऑनलाईनरित्या अर्ज करता येणार आहे. दरम्यान, सातबार्‍यातील बनावटगिरीला चाप लावण्यासाठी डिजिटल सातबार्‍यावर 16 अंकी क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमाकांच्या सहाय्याने सातबार्‍याची पडताळणी करता येईल.  

82 टक्के काम पूर्ण 

जिल्हयात 12 लाख 43 हजार 333 सातबार्‍यांची संख्या आहे. त्यापैकी 10 लाख 7 हजार 702 सातबार्‍यांचे म्हणजेच 82 टक्के सातबारे डिजिटल झाले आहेत.  देवळा, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, बागलाण या तालुक्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. तर नाशिक तालुक्यात केवळ 60 टक्के काम झाले आहे.

“पीक नुकसानीचे मदत वाटपात सध्या यंत्रणा व्यस्त आहे. मात्र, त्यातूनही वेळ काढून डिजिटल सातबार्‍याचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या 82 टक्के सातबार्‍यांची कामे पूर्ण झाली असून, 20 तारखेपर्यंत  हे सर्व काम संपविण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी कर्मचार्‍यांना दररोजचे लक्ष्य  ठरवून  दिले आहे.

-भुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी