Tue, Jun 02, 2020 14:48होमपेज › Nashik › सिन्नर येथे लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्यास पकडले

सिन्नर येथे लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्यास पकडले

Published On: Mar 20 2019 8:13PM | Last Updated: Mar 20 2019 8:13PM
सिन्नर : प्रतिनिधी
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील उपकोषागार अधिकारी अजित खाकाळे ( वय. ४४ रा, कमलनगर, इंदिरानगर, नाशिक) यास ३ हजार ८०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि.२०) दुपारी ३.१५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात भोजन पुरवठा ठेकेदार आहेत. त्यांचे भोजन ठेक्याचे ५ लाख ७७ हजार रुपयांचे बील शासनाकडून येणे बाकी होते. याबाबतची सर्व बिले तयार करून मंजूर करण्याचे काम उपकोषागार अधिकारी खाकाळे यांच्याकडे होते. हे बील मंजुर करण्यापोटी त्यांनी भोजन ठेकेदाराकडून बिलाच्या एक टक्का याप्रमाणे लाचेची मागणी केली होती. त्यावरून भोजन ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. काल दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक एस. टी. कांबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष हांडगे, राजू गिते आदींच्या पथकाने खाकाळे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.