होमपेज › Nashik › नाशिक : डेंग्यूसदृश तापाने नवापुरात घेतले दोन मुलांचे बळी

नाशिक : डेंग्यूसदृश तापाने नवापुरात घेतले दोन मुलांचे बळी

Published On: Sep 23 2019 5:46PM | Last Updated: Sep 23 2019 5:41PM

file photoनंदुरबार : प्रतिनिधी 

नवापूर शहर व तालुक्यात डेंग्युसदृश तापाचे थैमान सुरु असून शहरात अल्पवयीन दोन बालकांचा या साथीने बळी घेतला आहे. तर ४५ हून अधिक रुग्ण गुजरातमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे गुजरातचे खासगी डॉक्टर डेंग्यूने ग्रस्त असल्याचे प्रमाणपत्रात म्हटले असले ,तरी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग मात्र त्याना डेंग्यूची साथ असल्याचे नाकारत आहे. जोपर्यंत रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल हाती येत नाही तोपर्यंत अधिकृतपणे डेंग्यू असल्याचे म्हणता येणार नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके यांनी सांगितले.

नवापूर येथे डेंग्यु सदृश्य तापाच्या साथीमुळे रोज अनेक रुग्ण वेगवेगळ्या शहरांमध्ये जावून उपचारासाठी दाखल होत आहे. यानंतर नगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांनी दहा पथके कार्यरत केली आहेत. तर मलेरिया विभागाचे अधिकारी नवापुरात रवाना झाले असून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. काही रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फरहान मकराणी हा बारा वर्षीय बालक डेंग्यूसदृश तापामुळे उपाचारादरम्यान रविवारी सायंकाळी दगावला. दुपारी त्याला व्यारा येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

तसेच अब्दुल खालीक मोहम्मद माकडा (वय १७) या बालकाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला. तसेच अब्दुलचे वडील मोहम्मद माकडा यांनाही लागण झाल्याने बारडोली येथे हलविण्यात आले. व्यारा येथील बालरोग तज्ज्ञांकडे शहरातील २५ रुग्ण दाखल आहेत. एका नगरसेवकाचा पंधरा वर्षीय बालकाचाही त्यात समावेश आहे. 

बारडोली येथील एका खासगी दवाखान्यातून ७ दाखल रुग्णांपैकी चार बालक बरी होऊन परतली आहेत. सुरत येथे वेगवेगळ्या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत असल्याची चर्चा आहे. गुजरात राज्यातील उच्छल फुलवाडी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात नवापूर शहरातील ८ ते १० रुग्ण दाखल असल्याची माहिती शास्त्रीनगर भागातील रहिवाशांनी सांगितली. याशिवाय उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किर्तीलता वसावे यांचाशी संपर्क साधला असता डेग्यु रुग्णांसाठी एक वार्ड तयार करण्यात आल्याचे सांगितले. 

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात एकही डेंग्यूचा रुग्ण नाही अशी माहिती डॉ. वसावे यांनी दिली. उपाययोजना म्हणून नवापूर शहरात नवापूर नगरपालिकेने शहरातील काही भागात औषध फवारणी फॉगिंग मशिनव्दारे फवारणी सुरू केली.