होमपेज › Nashik › नाशिककरांनी अनुभवला सैन्य दलातील तोफांचा थरार (video)

नाशिककरांनी अनुभवला सैन्य दलातील तोफांचा थरार (video)

Last Updated: Jan 14 2020 9:17PM
नाशिक : प्रतिनिधी
छातीत धडकी भरवणारा आणि कर्णकर्कश आवाज, आग ओकणाऱ्या तोफा, डोंगरावरील धुळीचे लोट या वातावरणात नाशिककरांनी भारतीय सैन्य दलातील तोफांचा थरार आणि ताकद अनुभवली. काही सेकंदात भारतीय सैन्य दलातील तोफांनी हर्बरा, डायमंड, बहुला अशी शत्रुंच्या ठिकाणी तोफगोळे डागून अक्षरक्ष: धुळधाण उडवली. निमित्त होते. स्कुल ऑफ आर्टिलरी तर्फे आयोजित तोफांच्या वार्षिक सराव प्रात्यक्षिकाचे!

स्कुल ऑफ आर्टलरीच्या सराव मैदानावर सैन्यदलातील तोफोंचा हा थरार अनुभवण्यात आला. यावेळी सराव मैदानावरील डोंगरांवर बनवलेल्या हर्बरा, कोन हिल, डायमंड, बहुला १ व २ अशा ठिकाणांवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिविशिष्ट सेवा मेडल चीफ ऑफ स्टाफ जनरल लेफ्टनंट जनरल दिपेंदर सिंह अहुजा आणि परम विशिष्ट सेवा मेडल, स्कुल ऑफ आर्टिलरीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाते.

युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्य दलाकडील तोफा कशा प्रकारे काम करतात याचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने दाखवण्यात आले. शौर्य, संयम, अचूक वेध आणि देशप्रेमाच्या जोरावर शत्रुसैन्यावर अचुक मारा कसा केला जातो याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. यावेळी लहान व मोठ्या सर्व तोफांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यात मोर्टार (उखळी मारा करणारे), पिनाका रॉकेट लाँचर, फील्ड गन, बोफोर्स, अल्ट्रा लाइट होवित्झर तोफ, वर्ज टी टँक, ई १ सोलटम, इंडियन फिल्ड गन, स्मर्च रॉकेट लाँचर अशा आयुधांची मारक क्षमता, अचुकता अनुभवयास मिळाली. त्याचप्रमाणे शत्रुकडील विमाने, मिसाईलची माहिती देणारे भारतीय बनावटीचे स्वाती रडारही दाखवण्यात आले. तर चेतक, ध्रुव आणि चीता हेलिकॉप्टरच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी भारतीय सैन्य दलासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया आदी देशांमधील सैन्य दलातील जवानांनीही या प्रात्यक्षिकांचा थरार अनुभवला.