Tue, Nov 19, 2019 01:24होमपेज › Nashik › डॉ. कोल्हे, अजित पवारांना मागणी

डॉ. कोल्हे, अजित पवारांना मागणी

Last Updated: Oct 08 2019 1:30AM
नाशिक : प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अन्य दिग्गजांच्या सभांची मागणी करण्यात आली आहे. हे दिग्गज नाशिकमध्येसभांचा फड गाजविणार आहेत.

उमेदवारी अर्ज माघारीचा टप्पा पार पडला असून, आता जाहीर प्रचाराला सुरूवात होणार आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांबरोबरच पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांची धावपळ होणार आहे. त्याचबरोबरच पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांमुळे वातावरण फिरविण्यास मदत होत असल्याने अशा जाहीर सभांचेही नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश पातळीवर जाहीर सभांची मागणी कळविली आहे. त्यानुसार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच खासदार अमोल कोल्हे यांना अधिक मागणी आहे.

माजी उपमुख्यमंत्री तथा सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार, आक्रमक शैलीत भाषण करणारे धनंजय मुंडे यांचीही जाहीर सभा व्हावी म्हणून काही उमेदवारांनी मागणी केली आहे. कयाशिवाय पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल मिटकरी, नवाब मलिक, सुषमा अंधारे यांच्याही जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. माजी पालकमंत्री हे जिल्ह्यातच ठाण मांडून असून त्यांच्याही जाहीर सभा ठिकठिकाणी होणार आहेत. एकंदरीत, स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांनी पुढील काही दिवसात निवडणुकीचे रण तापणार आहे.