Tue, Jun 02, 2020 15:00होमपेज › Nashik › बागलाणची भूजल पातळी खोल खोल

बागलाणची भूजल पातळी खोल खोल

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 21 2018 11:50PMनाशिक : कुंदन राजपूत

‘धरणांचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. त्यातही बागलाणमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, भूजल सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा उणे 1.21 इतका जलसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, असा इशारा भूजल सर्वेक्षण विभागामार्फत देण्यात आला आहे.

इंडियन स्पेस अ‍ॅण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या (इस्त्रो) ताज्या अहवालानुसार मराठवाड्याचे भविष्यात वाळवंट होऊ शकते, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र देखील याच मार्गावर असून, कधी काळी पाणीदार अशी ओळख असलेला नाशिक जिल्हा देखील त्यास अपवाद नाही. जिल्ह्यात छोटी मोठी 22 धरणे असून, मुंबई, औरंगाबाद, नगर आदींची तहान भागविण्याचे काम नाशिक जिल्हा करतो. मात्र, मागील काही दिवसांपासून शेतीसाठी व अन्य कारणांसाठी बोअरवेलद्वारे प्रचंड प्रमाणात जमिनीतून पाणी उपसा होत आहे.

त्यामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याचे आकडेवारीवरुन पहायला मिळत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक विभागामार्फत सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 185 विहिरींची पाण्याची पातळी मोजण्यात येते. पाणलोट निहाय निरिक्षण विहिरींची निश्‍चित जमिनीपासूनची भूजलपातळी मोजली जाते. मागील पाच वर्षांची जानेवारी महिन्यातील आकडेवारी लक्षात घेता बागलाण तालुक्यात भूजल पातळी घटण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.

यंदा हे प्रमाण उणे 1.21 इतके नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात उणे 0.90, सुरगाणा तालुक्यात उणे 0.59, मालेगाव तालुक्यात उणे 0.23 इतकी भूजल पातळीत घट झाल्याचे पाहायला मिळते. बागलाण हा दुष्काळी तालुका असून, या ठिकाणी पर्जन्यवृष्टी कमी होते. शिवाय येथील जमीन खडकाळ असल्याने जमिनीत पाणी मुरत नाही. तसेच, मागील काही वर्षात जिल्ह्यातील इतर ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे देखील या ठिकाणी भूजल पातळीत घट झाल्याचा दावा, भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

 

Tags : Nashik , Nashik News, ground water, Decrease,