Sun, Jan 19, 2020 22:11होमपेज › Nashik › तांत्रिक अहवालानंतर पुलांच्या मान्यतेचा निर्णय 

तांत्रिक अहवालानंतर पुलांच्या मान्यतेचा निर्णय 

Published On: Aug 29 2019 9:06AM | Last Updated: Aug 28 2019 11:09PM
नाशिक : प्रतिनिधी

गोदावरी नदीवर प्रस्तावीत नवीन दोन पुलांवरून सध्या वादंग सुरू आहे. यामुळे हे दोन्ही पूल उभारण्यावरून सध्या लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत तर दुसरीकडे यासंदर्भातील तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. या अहवालानंतरच प्रशासकीय मान्यतेचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. 

गेल्या 20 ऑगस्ट रोजी झालेल्य महासभेत गोदावरी नदीवर दोन नवीन पूल उभारणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकासाठी या दोन्ही पुलांसाठी तरतूद धरण्यात आली होती. प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यासाठी अधिकची तरतूद धरण्यात आली. या पुलांच्या बांधकामांना नगरसेवकांसह आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केल्यानंतरही प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आणि महासभेने त्यास मान्यता दिली. यामुळे पुलांवरून लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू झाला आहे. सध्या गोदावरीत असलेल्या सहा पुलांमुळे आधीच पुरपातळीत वाढ झाली आहे. यादोन पुलांमुळे त्यात आणखी भर पडणार असल्याची भिती आमदार फरांदे यांनी व्यक्‍त केली आहे. तर दुसरीकडे महापौरांनी मंजूर प्रस्तावाचा ठराव प्रशासनाला सादर केल्याने या पुलांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी यासंदर्भात निर्माण झालेला वाद लक्षात घेता आयुक्‍तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता संजय घुगे यांना तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याआदेशानंतर प्राप्‍त होणार्‍या अहवालाच्या आधारेच पूल उभारणीचा व निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्‍त गमे यांनी सांगितले. आयुक्‍तांच्या या वक्‍तव्यामुळे संंबंधितांना दिलासा मिळाला असला तरी तांत्रिक अहवालात काय बाबी आढळून येतात, यावरच पुढील गणित अवलंबून राहील.