Thu, Aug 13, 2020 16:37होमपेज › Nashik › नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक

नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक

Published On: Dec 17 2017 12:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:21AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

इंदिरानगर परिसरातून पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कुख्यात चन्याबेग टोळीतील एका गुंडास अटक केली आहे. अंकुश रमेश जेधे (24, रा. श्रीरामपूर) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अंकुशचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथ्लृक शनिवारी (दि.16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वासननगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोघा युवकांवर पोलिसांना संशय आल्याने चौकशीसाठी पोलीस त्यांच्या दिशेने गेले. त्यामुळे दोघेही संशयित दुचाकीवरून पळाले. रस्ता संपल्याने संशयितांनी दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करीत अंकुशला पकडले. त्याच्याकडष एक गावठी कट्टा आणि तीन काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याच्याकडील एमएच 12 पीएल 2879 क्रमांकाची दुचाकीही जप्त केली आहे. अंकुशचा साथीदार नईम सैयद (रा. श्रीरामपूर) हा फरार झाला. पोलिसांच्या तपासात अंकुश आणि नईम मोक्कातील गुन्हेगार असून ते दोन वर्षांपासून फरार आहेत. नगरमधील सागर बेग उर्फ चन्याबेग टोळीतील दोघेही गुंड असून चन्याबेगचा अंकुश नातलग असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. 

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून बेग टोळीतील तीघा संशयितांना शस्त्रांस्त्रासह सापळा रचून अटक केली होती. या टोळीतील गुंडांनी शहरातही एकाचा खुन केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अंकुश आणि नईम शहरात का आले होते, त्यांचा कोणाशी संपर्क झाला याचा शोध शहर पोलीस घेत आहेत.