Tue, Nov 19, 2019 05:03होमपेज › Nashik › समीर भुजबळांसह तलाठ्यावर गुन्हा

समीर भुजबळांसह तलाठ्यावर गुन्हा

Published On: Aug 04 2019 1:51AM | Last Updated: Aug 04 2019 12:20AM
मालेगाव : प्रतिनिधी

गिसाका येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी सरकारी कागदपत्रांत फेरफार केल्या प्रकरणी दाभाडीचे तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तक्रारदार शिवाजी सीताराम पाटील (48) या शेतकर्‍याचा चार-पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महसूल विभागांतर्गत झालेल्या अंतर्गत चौकशीत तलाठ्यावर दोषारोप ठेवण्यात आल्यानंतर पोलीस कारवाईचा मार्ग मोकळा झाला.

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई निंबाबाई सीताराम पाटील यांची दाभाडी शिवारातील गट नंबर 120/799 ही वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात त्यांची नाव समाविष्ट आहे. दरम्यान, गिरणा सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाल्यानंतर आर्मस्ट्राँग कंपनीने तो विकत घेतला. त्यानंतर दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी आर्मस्ट्राँग कंपनीच्या हितासाठी शेत गट नंबर 120/799 च्या सातबारा उतार्‍यावर जुलै 2014 मध्ये एकाच महिन्यात पडिक व पीकपेरा असा वेगवेगळा शेरा मारून तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून सरकारी कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून सेवानिवृत्त तहसीलदार ए. यू. बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली.

या समितीने केलेल्या चौकशीत तलाठी मोरे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख 1971 च्या नोंदवह्या तयार करणे-सुस्थितीत ठेवणे या नियमाचे उल्लंघन केले शिवाय वेगवेगळी पीकपाहणी लावून अधिकाराचा गैरवापर केल्याचा दोषारोप सिद्ध झाला. त्या अहवालाआधारे दि. 25 मार्च 2019 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी मोरे यांची एक वेतनवाढ कायम राखून ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या आधारे आपली फसवणूक झाली असल्याचा संदर्भ देत पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली.न्यायालयीन प्रक्रियेनंतर सीआरपीसी 156 (3) अन्वये छावणी पोलीस ठाण्यात तलाठी मोरे व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे हे करीत आहेत.