Mon, Sep 21, 2020 11:12होमपेज › Nashik › नंदुरबारमध्ये कोरोनाने ५ दिवसांत ४ जणांचा मृत्यू  

नंदुरबारमध्ये कोरोनाने ५ दिवसांत ४ जणांचा मृत्यू  

Last Updated: Jul 15 2020 12:48PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात कोरोनाने बळी घेतलेल्या रूग्णांची संख्या आज १४ झाली आहे. येथे दर ३६ तासानंतर एक कोरोनाने मृत्यू होत असून १० ते १५ जुलै दरम्यान उपचारादरम्यान ४ वृद्धाचा लागोपाठ मृत्यू झाला आहे.  

कोरोनापासून आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील चित्र अवघ्या चार दिवसांत पालटले आहे. मृत्यूचा दर वाढल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता २३  कोरोना चाचणी अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यानंतर आयसीएमआर पोर्टलवरून ४ कोरोना बाधित नंदुरबार जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले होते. यावेळी एकूण घेतलेल्या २२४२ स्वॅबपैकी १८९८ अहवाल निगेटिव्ह आले होते. तर यात पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २२४ होती. यातील १० रूग्णांचा मृत्यू झाला होता. 

१२ जुलैला सायंकाळी ६ वाजता प्राप्त ५५ कोरोना चाचणी अहवालांपैकी ९ रूग्ण पॉझिटिव्ह आले. यात नंदुरबार आणि शहादा जिल्हे कोरोनात आघाडीवर राहिला. याचदिवशी नंदुरबार शहरात आंबेडकर चौकातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू होऊन कोरोना बळींची संख्या ११ झाली. तसेच १३ जुलै रोजी आणखी पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच १४ जुलै रोजी नव्याने तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. 

नंदुरबार शहरातील जयंवत चौकात ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या पाठोपाठ उपचार सुरू असलेल्या ८१ वर्षीय आणखी एका विसरवाडी येथील वृद्धेचा रात्री मृत्यू झाला. परिणामी कोरोना बळींची संख्या १३ वर पोहोचली. या दिवशी एकूण २७२ रूग्ण पॉझिटिव्ह, कोरोनामुक्त १६८, उपचार सुरू असलेले ८१ आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेले १० अशी एकंदरीत स्थिती होती. 

तथापि आज १५ जुलै रोजी सकाळी नंदुरबार येथील तुलसीविहार कॉलनीतील ७५ वर्षाच्या रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हा रुग्ण १३ जुलै रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाला होता. आणि १४ जुलै रोजी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एकापाठोपाठ वृद्ध व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होत असून अवघ्या पाच दिवसांत १० वरून मृत्यूची संख्या १४ वर गेली आहे.

१४ जुलै रोजीच्या सायंकाळपर्यंतच्या अहवालानुसार, नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५२६ जणांचे नमुने घेण्यात आले होते. यातील २ हजार ७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर एकूण पॉझिटिव्ह २७२ रूग्ण आढळले. यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला. यातील ७९ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेरील पुणे, नाशिक आणि बडोदा येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या १० झाली. उर्वरित कोरोनामुक्त होऊन १६८ रूग्ण घरी परतले आहेत. तसेच जवळपास अजून १६५ जणांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.

 "