Tue, Jun 02, 2020 12:20होमपेज › Nashik › वादग्रस्त स्मार्ट प्रकल्प; आजच्या बैठकीत निर्णय 

वादग्रस्त स्मार्ट प्रकल्प; आजच्या बैठकीत निर्णय 

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 17 2019 11:29PM
नाशिक : प्रतिनिधी

स्काडा वॉटर मीटर, स्मार्ट रोड, स्मार्ट पार्किंगसंदर्भात अनेक तक्रारी असूनही त्यासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने नाशिकमधील अनेक स्मार्ट प्रकल्प रखडले आहेत. स्काडाविषयी अंतिम टप्प्यात असलेल्या निविदा प्रक्रियेत बदल केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावर स्मार्ट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेत संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आश्वासन संचालक मंडळाला दिले होते. यामुळे आज (दि.18) होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. 

स्मार्ट प्रकल्पांविषयी योग्य निर्णय न घेतल्यास तसेच कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांच्यावर कारवाई न केल्यास कंपनीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संचालक मंडळाने दिलेला होता. यामुळे आजच्या सभेत संचालक मंडळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. शहरात सर्वच ठिकाणी स्काडा प्रणालीअंतर्गत वॉटर मीटर बसविले जाणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च येणार आहे. या वॉटर मीटरमुळे पाण्याची बचत होणार असून, मीटर रिडींगनुसारच ग्राहकांकडून बिल वसूल केले जाईल. संपूर्ण शहरात स्काडा प्रणालीअंतर्गत मीटर बसविले जाणार असून, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने निविदा प्रक्रिया राबविली होती. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच कंपनीच्या अधिकार्‍यांनी शुद्धिपत्रकाद्वारे मूळ निविदेत असलेली पॅरेंट कंपनीची अट शिथिल करून अन्य कंपनीला मान्यता देण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती.

ही बाब संशयास्पद वाटल्याने कंपनीचे संचालक अजय बोरस्ते, दिनकर पाटील, शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांच्यासह अन्य संचालकांनी शुद्धिपत्रकाला हरकत घेत ही बाब कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यामुळे कुंटे यांनी बैठक न घेता स्काडासंदर्भातील निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश सीईओ थविल यांना दिले होते. तसेच थविल यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले होते. असे असताना थविल यांनी स्काडा निविदेविषयी स्पष्टीकरण देताना वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करूनच शुद्धिपत्रक काढल्याचा दावा केला होता. यामुळे वरिष्ठ म्हणून सीताराम कुंटे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे हेच अडचणीत सापडले होते. यामुळे आता आज (दि.18) होणार्‍या बैठकीत संचालक आणि वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.