Wed, Jun 03, 2020 20:36होमपेज › Nashik › काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली

काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली

Published On: Apr 27 2019 2:00AM | Last Updated: Apr 26 2019 11:24PM
धुळे : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजी, वडील व आई यांना देशाने सत्ता दिली. मात्र, त्यांनी गरिबी दूर केली नाही. आता 60 वर्षांनंतर राहुल गांधी गरिबी दूर करण्यासाठी 72 हजार प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचे स्वप्न दाखवत आहेत. काँग्रेसने जनतेची नव्हे, तर त्यांच्या चेल्यांची गरिबी दूर केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. येथील पांझरा नदीलगत मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील हिंदू हा सहिष्णू आहे. त्याने या देशात आश्रयासाठी येणार्‍या कोणत्याही जातीच्या समूहाला सामावून घेतले. मात्र, कधीहीं धर्माच्या नावाने मत मागितले नाही. आम्हाला प्रत्येक समूहाचे मत हवे आहे. मात्र, ज्यांना मत मागतांना हिंदू असण्याची लाज वाटणार असेल त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असे सांगितले. तसेच, पांझरा नदीच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांसाठी सरकारने निधी दिला आहे. पण, काही लोक त्यावर मालकी दाखवत आहेत अशा नेत्यांना महानगरपालिका निवडणुकीत जनतेने नाकारून त्यांची जागा दाखवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जनता जागा दाखवेल असा  टोला त्यांनी आमदार अनिल गोटे यांनी लगावला.

तसेच, काँग्रेसचा जाहीरनामा केवळ स्वप्नाळू आहे. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना संताजी- धनाजी प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्व ठिकाणी दिसतात. काँग्रेसने जाहीरनाम्यात काश्मीरमधून सैन्य कमी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण हा देश पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही. आमच्या सैन्यावर कुणी एक गोळी झाडणार असतील तर आम्ही त्यांच्यावर चार गोळ्या झाडणार असल्याचे म्हटले.