Wed, Jun 03, 2020 20:15होमपेज › Nashik › आदर्श पुरस्कारांच्या वितरणाबाबत साशंकता

आदर्श पुरस्कारांच्या वितरणाबाबत साशंकता

Published On: Sep 01 2019 1:49AM | Last Updated: Aug 31 2019 10:52PM
नाशिक : प्रतिनिधी

मागील दोन वर्षे आणि यंदाच्या वर्षाचे शिक्षक पुरस्कार एकत्रित देण्याचे महापालिकेने निश्चित केले असले तरी मुहूतार्र्ची तारीख मात्र ठरू शकलेली नाही. त्यात आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने निवडणुकीनंतरच शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडण्याची शक्यता आहे. कारण 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक करण्याची परंपरा असली तरी मनपा शिक्षण मंडळाच्या अद्याप पुरस्कारार्थी शिक्षकांचीच निवड होऊ शकलेली नाही.

शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे तसेच अध्यापनाचे काम करत असताना सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या शिक्षकांना गौरविले जाते. शैक्षणिक गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केेले जातात. राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा शिक्षकांची निवड केली जाते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडूनही दरवर्षी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना सन्मानित केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कारार्थींची निवड होऊनही महापालिकेने शिक्षकांचा सन्मान केलेला नाही. 2017-18 साठी सहा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली. त्यानंतर 2018-19 करता 15 शिक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या दोन्ही वर्षांच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा महाकवी कालिदास कलामंदिर येथे आायोजित करण्यात आला होता. त्याची तयारी करण्यात आली.

मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांची तारीख न मिळाल्याने कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्याचबरोबर मागील वर्षी शिक्षण समिती पदाधिकारी व सदस्यांचीही निवड झाली नव्हती. यामुळे शिक्षण समितीच नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम न झाल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आताही शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यावर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची छाया आहे. यामुळे केवळ नावांची घोषणा होणार की पुरस्कार वितरणही होणार याविषयी यंदाही साशंकताच आहे. 

यावर्षीच्या पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी मनपा शिक्षण मंडळाने शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले होते. आता प्राप्त प्रस्तावांची छाननी 3 सप्टेंबर रोजी पुरस्कार निवड समितीची बैठक शिक्षण मंडळ कार्यालयात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. शिक्षण सभापती सरिता सोनवणे, उपसभापती प्रतिभा पवार, प्रशासनाधिकारी देवीदास महाजन हे या समितीवर आहेत. मागील दोन वर्षांचे आणि यंदाचे अशा तिन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रित सोहळ्यात वितरित केले जाण्याचे मनपा शिक्षण मंडळाचे नियोजन आहे. आता त्यासंदर्भातील तारीख निश्चित करणे, त्यासाठी प्रमुख पाहुणे शोधावे लागणार आहे. हे सर्व जमून आले तर पुरस्कार वितरण सोहळा होईल, अन्यथा विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षकांच्या गळ्यात पुरस्काराची माळ पडेल.