होमपेज › Nashik › ‘बिग बॉस’मधील ‘रोमान्स’विरोधात नाशिकच्या विद्यार्थ्याची पोलिसांत तक्रार

‘बिग बॉस’मधील ‘रोमान्स’विरोधात नाशिकच्या विद्यार्थ्याची पोलिसांत तक्रार

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:39PMनाशिक : प्रतिनिधी

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शो मधील रोमांस विरोधात विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एनबीटी विधी महाविद्यालयात शिकणार्‍या ऋषिकेश बळवंत देशमुख या विद्यार्थ्याने कलर्स वाहिनीच्या सर्व संचालकांसह मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांविरोधात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

बिग बॉस या मालिकेत कलाकार राजेश शृंगारपुरे व रेशम शेठटिपनीस यांच्यात प्रेमसंबंध झाल्याचे दाखवण्यात येत असून त्यांच्यातील संवाद अश्‍लिल स्वरुपाचा असून आक्षेपार्ह कृत्यदेखील करीत असल्याचा आरोप ऋषिकेशने केला आहे. 

त्यांच्या या अशोभनीय व अश्‍लील कृतीमुळे अतिशय लज्जास्पद भावना निर्माण झाल्या आहेत. अशाप्रकारची दृश्य आपल्या संस्कृतीला काळीमा फासणार्‍या असून, संबंधितांवर याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ऋषिकेशने केली आहे. या तक्रार अर्जात ऋषिकेशने कलर्स वाहिनीच्या सर्व संचालकांसह राजेश आणि रेशम तसेच शोचे निर्माते यांच्यासह सर्व ज्ञात- अज्ञातांविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 व 67 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.