Tue, May 26, 2020 14:40होमपेज › Nashik › बारावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा मार्ग मोकळा

बारावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा मार्ग मोकळा

Last Updated: Feb 18 2020 1:51AM
नाशिक : नितीन रणशूर

21व्या शतकातही जातीचे भूत उतरण्याचे नाव घेत नाही. प्रतिष्ठेच्या नावाखाली मुला-मुलींची अडवणूक केल्याचे प्रकार आजही सर्रास बघावयास मिळतात. आंतरजातीय विवाह केल्याने शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या पालकाला विभागीय शिक्षण मंडळाने चपराक लावली आहे. संबंधित पालकाने सादर केलेला ‘नो कॅन्डिडेट’चा प्रस्ताव शिक्षण मंडळाने फेटाळून लावला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाण (बारावी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात येतात. अर्जांची छाननी झाल्यानंतर ‘नो कॅन्डिडेट’ प्रस्तावाबाबत विचारणा होते. संबंधित परीक्षार्थींची मानसिक व शारीरिक स्थिती, वर्गातील हजेरी, त्याचे वर्तन आदींमुळे परीक्षेस अपात्र ठरण्याची शक्यता गृहीत धरून शाळा-महाविद्यालय पालकांच्या संमतीने तर कधी स्वत:चे अधिकार वापरून शिक्षण मंडळाकडे ‘नो कॅन्डिडेट’ प्रस्ताव सादर करतात. संपूर्ण प्रस्तावाची तपासणी करून शिक्षण मंडळ त्यावर पुढील कारवाई करते. आज (दि.18) पासून इयत्ता बारावीची लेखीपरीक्षा सुरू होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी पालकाने आपल्या मुलीचा ‘नो कॅन्डिडेट’ प्रस्ताव शिक्षण मंडळाला दिला. प्रस्तावात मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिला परीक्षेला बसण्याची परवानगी देऊ नये, असे नमूद केले होते.

मात्र, शिक्षण हा देशाच्या संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. कोणाचाही शिक्षणाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे सुनावत शिक्षण मंडळाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.  शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांचे या प्रकरणी समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनीच्या संपूर्ण परीक्षेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच दररोज संबंधित विद्यार्थिनीच्या पेपरची माहिती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले असल्याने या विद्यार्थिनीला मोठा दिलासा लाभला आहे.