Wed, Jun 03, 2020 00:14होमपेज › Nashik › मिशन ऑल आउट

मिशन ऑल आउट

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 11:08PM
नाशिक : प्रतिनिधी

गणेशोत्सवानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी. तसेच, महाजनादेश यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहर पोलिसांनी संपूर्ण शहरात मिशन ऑल आउट आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात 105 टवाळखोरांसह रेकॉर्डवरील 92 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. 

पोलीस आयुक्‍त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.14)  रात्री 11 ते मध्यरात्री 2 पर्यंत शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. शहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी व गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच शहरातील हॉटेल, लॉजही तपासणी करण्यात आली. शहरातील सीमावर्ती भागातही पोलिसांनी तपासणी केली. 

संपूर्ण कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील 127 पैकी 92 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचप्रमाणे फरार असलेल्या 21 संशयित आरोपींपैकी दोघांना पकडले.  शहरातील 91 हॉटेल्स व धाबे चेक करीत, 63 जणांविरुद्ध मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान 37 मद्यपीचालकांवर तर दारुबंदी कायद्यानुसार पंचवटीत दोन आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. नाकाबंदीत 540 वाहनांची तपासणी करण्यात आली. 

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 92 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याचबरोबर शहरातील विविध भागामधील 105 टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली 4 पोलीस उपआयुक्‍त, 7 सहायक पोलीस आयुक्‍त, 23 पोलीस निरीक्षक, 51 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 507 पोलीस कर्मचारी असा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता. 

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलिसांची ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.