Tue, Aug 04, 2020 14:00होमपेज › Nashik › 'खिलाडी'ची हवाई भरारी वादात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश  

'खिलाडी'ची हवाई भरारी वादात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश  

Last Updated: Jul 04 2020 2:18PM
पालकमंत्री छगन भुजबळांनी दिले अक्षयकुमारच्या नाशिक दौऱ्याच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने तीन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे केलेला खासगी दौरा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या संकटाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री वाहनाने प्रवास करीत असताना अक्षयकुमार यांच्या हॅलिकॉप्टर दौऱ्याची परवानगी व खासगी रिसॉर्टमधील मुक्कामावरून प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि. ४) दिले आहेत.

नाशिकमध्ये मार्शल आर्ट ट्रेनिंग अॅकॅडमी किंवा निसर्गोपचार केंद्रासाठीची माहिती घेण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने तीन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर दौरा केला. खासगी हॅलिकॉप्टरने येथील सपकाळ नॉलेज हॅबच्या हॅलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून जवळच असलेल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये त्यांनी मुक्काम केला. 

दरम्यान, या दौऱ्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. मात्र, शुक्रवारी (दि.३) या दौऱ्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या सीमा बंद असताना अक्षय कुमार यांना या दौऱ्यासाठी परवानगी कशी देण्यात आली. त्यातही मुख्यमंत्री आषाढी वारीसाठी मुंबई ते पंढरपुर वाहनाने दौरा करतात. तर इतर मंत्रीदेखील हवाई प्रवास टाळत असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टर दौऱ्याला अनुमती दिलीच कशी? तसेच कोरोनाकाळात हॉटेल, रिसॉर्ट बंद ठेवण्याचे निर्देश असताना त्यांच्यासाठी रिसॉट कसे काय उघडण्यात आले, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पालकमंत्री भुजबळ यांनी या प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते अक्षय कुमार नाशिकमध्ये काही करीत असल्यास त्याचे स्वागत आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात या दौऱ्याला परवानगी कोणी दिली याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच यात नियम डावलले गेल्याचे आढळून आल्यास प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे या दौऱ्यामागचे गुपित लवकरच समोर येणार आहे.

प्रशासनाला माहितीच नाही

जिल्ह्यात हॅलिकॉप्टर लॅन्डींगची परवानगी जिल्हा प्रशासनामार्फत दिली जाते. मात्र, या दौऱ्यात लॅन्डींगबाबतची परवानगी कोणी दिली, याबद्दल काही अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता याबाबत माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचा भाग हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असताना तेथे नाशिक पोलिसांचा ताफा कशासाठी होता, असा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
 

वाचा - मार्शल आर्ट अकॅडमीसाठी अक्षयकुमार नाशिकमध्ये