Fri, Jun 05, 2020 17:25
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › महाराष्ट्राचे पाणी गुजरातला  लिहून देऊ नका : भुजबळ

'महाराष्ट्राचे पाणी गुजरातला लिहून देऊ नका'

Published On: Jul 26 2019 1:49AM | Last Updated: Jul 26 2019 1:49AM
नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या भूमीत पडणार्‍या पाण्यावर महाराष्ट्राचाच हक्क आहे. गुजरातला वाहून जाणारे आपल्या हक्काचे सगळे पाणी आपण अडवू. फक्त महाराष्ट्राचे पाणी गुजरातला लिहून देऊ नका, असे आवाहन नाशिकचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी आज केले. ते म्हणाले, ‘मांजरपाडा प्रकल्प’ हा या दृष्टीने आपला ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी काही प्रमाणात का होईना या प्रकल्पाने अडवले आहे. हे केवळ एक उदाहरण असून, यासारखे अनेक प्रकल्प आपल्याला साकारता येतील, असा विश्‍वास व्यक्त करून आपणास पाण्यात राजकारण करावयाचे नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

देवसाने-मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार भुजबळ बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात देवसाने मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याच सरकारच्या काळात जवळपास 95 टक्के पूर्ण झाले होते. सरकारचा कार्यकाळ संपत असताना उर्वरित कामासाठी 70 कोटी रुपये मंजूर करून ठेवले होते. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने ते पैसे इतरत्र वळविले. नंतर प्रसंगी अधिवेशनात सभागृहाच्या वेलमध्ये बसून आम्ही ठिय्या मांडला. कारागृहातून पत्रव्यवहार करून सरकारचे लक्ष वेधले आणि बाहेर आल्यानंतरही पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर सरकारने उर्वरित खर्चाला मान्यता दिली. जर मंजूर केलेले पैसे इतरत्र वळविले नसते तर तीन वर्षांपूर्वीच येवला, चांदवडला पाणी आले असते, असे त्यांनी सांगितले.

आंध्रप्रदेश सरकारने कालेश्वरम प्रकल्प राबविला. या प्रकल्पात 650 मीटरहून अधिक उंचीवर पाणी लिफ्ट केले जात आहे. त्याचधर्तीवर देवसाने-मांजरपाडा प्रकल्पाकडे उदाहरण म्हणून बघावे आणि महाराष्ट्राचे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून ते महाराष्ट्रात वळविले तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातून गुजरातला वाहून जाणारे पाणी वळण बंधारे आणि बोगद्यांतून गोदावरी खोर्‍यात आणणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे. तर 10.16 किमी बोगद्यातून पाणी वळवणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. गुजरातमध्ये जाणारे पाणी आपण पूर्वेकडे वळवू शकतो, त्याचे हे एक यशस्वी उदाहरण आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी आज ना उद्या उचलू पण हे पाणी गुजरातला लिहून देऊ नका, यासाठी कितीही कर्ज काढावे लागले तर ते काढा. त्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या आणि महाराष्ट्राच्या मातीवर पडणार प्रत्येक थेंब महाराष्ट्राला मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

‘वळचणीचे पाणी आढ्याला गेले’ हा संत एकनाथांचा अभंग गाऊन आमदार नरहरी झिरवाळ यांनी भुजबळ यांच्या अथक प्रयत्नामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळाल्याने ते आधुनिक भगीरथ असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. दुष्काळी चांदवड व येवला तालुक्यांना पाणी पोहचविण्याचे श्रेय त्यांनी भुजबळांना दिले. राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे शेटे यांनी, दिंडोरी तालुक्यातील जनतेचा त्याग अधोरेखित करून स्थानिक शेतकर्‍यांना चारणवाडी धरणामध्ये 100 द.ल.घ.फू. पाणी राखीव ठेवण्याची मागणी केली. महाले यांनीही मनोगत व्यक्त केले. 

यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, नगरसेवक गजानन शेलार, सरचिटणीस दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन सोनवणे, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, वसंतराव पवार, अरुण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदी उपस्थित होते.