Fri, Jun 05, 2020 17:07
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ‘केबीसी’च्या चव्हाण दाम्पत्यास जामीन मंजूर

‘केबीसी’च्या चव्हाण दाम्पत्यास जामीन मंजूर

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:38PMनाशिक : प्रतिनिधी

केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब छबू चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना नाशिकच्या मुख्य गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मे 2016 पासून चव्हाण दाम्पत्य कारागृहात आहे. मात्र, इतर गुन्ह्यांत जामीन न मिळाल्याने चव्हाण दाम्पत्याची सुटका होणार नसल्याचे चित्र आहे.

गुंतवणूकदारांना तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून चव्हाण दाम्पत्यांसह इतर संशयितांनी महाराष्ट्रासह, राजस्थानमधील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात 11 जुलै 2014 मध्ये संशयितांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयितांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्‍त करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या 289 पानी दोषारोपपत्रात केबीसी कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना 212 कोटी 18 लाख 39 हजार 980 रुपयांना गंडवल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी 178 कुटुंबीयांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत. मे 2016 पासून चव्हाण दाम्पत्य नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. या दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान पोलिसांनी तपासासाठी त्यांचा ताबा घेतला होता.

न्यायालयात चव्हाण दाम्पत्यांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी न्यायालयात युक्‍तिवाद त्यात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल असून, गुन्ह्यातील पुरावादेखील कागदोपत्री आहे. पुराव्याचे कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आल्याने त्यात फेरफार करणे शक्य नाही. तसेच या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होण्यास बर्‍याच वर्षांचा कालावधी लागेल. तर चव्हाण दाम्पत्य सुमारे दोन वर्षे कारागृहात असल्याने त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. भिडे यांनी केली होती.