Thu, Jan 28, 2021 06:32होमपेज › Nashik › कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चपळगावकर? 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चपळगावकर? 

Published On: Jul 15 2019 2:01AM | Last Updated: Jul 14 2019 10:57PM
नाशिक : प्रतिनिधी

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांची मुदत संपत असल्याने हे पद न्या. चपळगावकर यांच्याकडे येणार असल्याचे वृत्त असून, येत्या 28 जुलै रोजी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या चार नव्या विश्‍वस्तांच्या निवडीची घोषणा रविवारी (दि. 14) करण्यात आली. त्यांत न्या. चपळगावकर यांचा समावेश आहे. प्रतिष्ठानच्या विश्‍वस्तपदाची मुदत 5 वर्षे असते. संबंधित विश्‍वस्ताची व कार्यकारी मंडळाची संमती असल्यास आणखी पाच वर्षे मुदत वाढवून मिळू शकते. सन 2014 मध्ये अध्यक्षपदी विराजमान झालेल्या कर्णिक यांच्या विश्‍वस्तपदाची मुदत या महिन्यात संपते आहे. प्रतिष्ठानचा अध्यक्ष हा विश्‍वस्त असणे आवश्यक असल्याने कर्णिक यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यांना पाच वर्षे वाढीव मुदत मिळू शकली असती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे ते ही जबाबदारी नाकारणार असल्याचे कळते. परिणामी, नवा अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली व त्यानुसार न्या. चपळगावकर यांची विश्‍वस्तपदी निवड करण्यात आली. न्या. चपळगावकर यांनी यापूर्वी सन 2000 ते 2005 या कालावधीत प्रतिष्ठानच्या विश्‍वस्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तेव्हाच त्यांना मुदत वाढवून देण्याचा विचार सुरू होता. मात्र, कार्यबाहुल्यामुळे न्या. चपळगावकर यांनी मुदतवाढ नाकारली होती. आता त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यासाठी नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्यासह चार नव्या विश्‍वस्तांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाच्या पुढील बैठकीत न्या. चपळगावकर यांच्या अध्यक्षपदावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्यता आहे. येत्या 28 जुलै रोजी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, त्याआधीच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचे कळते.