Sun, Jan 19, 2020 15:20होमपेज › Nashik › साई महा ई सेवा केंद्राचे ऑपरेटर व संचालकाविरुद्ध गुन्हा

साई महा ई सेवा केंद्राचे ऑपरेटर व संचालकाविरुद्ध गुन्हा

Published On: Aug 31 2019 12:01PM | Last Updated: Aug 31 2019 12:01PM

संग्रहित छायाचित्रसुरगाणा : वार्ताहर 

ऑनलाईन व संगणक प्रणाली वापरण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) यंत्रणेला बोटांच्या ठशाचा रबरी स्टॅम्प बनवत आव्हान दिल्याचा प्रकार सुरगाणा येथील साई महा ई सेवा केंद्रात उघडकीस आला आहे. सदर प्रकार सुरू असलेल्या आधार केंद्राचे ऑपरेटर विरुद्ध व केंद्राचे संचालक सचिन सुर्यवंशी व पत्नी  जयश्री सुर्यवंशी यांच्‍या विरुद्ध तहसिलदार दादासाहेब गिते यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत सदर केंद्रातील साहित्य जप्त केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साई महा ई सेवा केंद्र हे तहसील आवारात न चालवता संचालकाने खासगी जागेत सुरू केले होते. सदर केंद्रात सुपरवायर, ऑपरेटर यांना सदर प्रणालीला अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य असून सदर व्यक्तीला ते काम करणे आवश्यक आहे. सदर बोटांचे ठसे प्रत्येकवेळी थोडेफार वेगळे येणे अपेक्षित असताना येथील केंद्रातून अपलोड होणारे बोटांचे ठसे हे एकसारखे येत असल्याचे मुंबई येथील आधारच्या मुख्य कार्यालयाचे निदर्शनास आले. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात आले. 

सदर कार्यालयाचे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केले असता हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार गंभीर असल्याने सुरगाणा तहसीलदार दादासाहेब गिते यांनी सुरगाणा पोलिस ठाण्यात सदर केंद्रातील ऑपरेटर व संचालक यांच्याविरुद्ध ठकबाजीची तक्रार दिली आहे. सुरगाणा पोलिसांनी सदर आधार केंद्रातील साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे अधिक तपास करत  आहे.

फिंगरप्रिंट यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ?

प्रत्येक व्यक्तीचे बोटांचे ठसे वेगवेगळे असतात. त्यामुळे संगणक प्रणालीत सुरक्षिततेसाठी बोटांचे ठसे वापरले जातात. बँकेत व विविध अस्थापणेत ही प्रणाली संगणक लॉगिनसाठी वापरली जाते. तसेच आता बँकेतून आधार लिंक खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी (आधार एनएबल पेमेंट सिस्टीम ) मध्ये खातेधारकाचे बोटांचे ठसे देत रोख रक्कम काढली जाते. तसेच विविध शासकीय योजनांसाठी लाभार्थीचे बोटांचे ठसे वापरले जाते. मात्र सदर यंत्रणेचाही गैरवापर झाल्याचे उघडकीस आल्याने या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.