Fri, May 29, 2020 08:48होमपेज › Nashik › वनविभागाच्या भरतीकडे उमेदवारांनी फिरवली पाठ

वनविभागाच्या भरतीकडे उमेदवारांनी फिरवली पाठ

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 11:12PM
नाशिक : प्रतिनिधी

वनविभागाच्या भरतीकडे उमेदवारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. वनरक्षकांच्या 44 जागांसाठी राबविण्यात येत असलेली भरती अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, काही प्रवर्गांत उमेदवारच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वनविभागात सर्वेक्षकांपाठोपाठ आता वनरक्षकांच्याही काही जागा रिक्त राहणार आहेत. 

नाशिक वनवृत्तातील वनरक्षक पदांच्या भरतीत महिला उमेदवारांचा अल्प  प्रतिसाद लाभला आहे. काही प्रवर्गांत गुणवत्ता यादीसाठीही उमेदवार मिळाले नाहीत. वनरक्षकांच्या 44 जागांसाठी भरतीप्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातील चाल चाचणीसाठी केवळ 31 उमेदवार गुणवत्ता यादीत पात्र ठरले आहेत. रिक्‍त जागांच्या तुलनेत उमेदवार पात्र न ठरल्याने 11 जागा रिक्‍त राहण्याची शक्यता आहे वनरक्षक पदासाठी विज्ञान, अर्थशास्त्र, भूगोल आणि गणित यापैकी एका विषयासह बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र होते. भरतीच्या लेखी परीक्षेतून 175 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यापैकी 124 उमेदवार शारीरिक व कागदपत्रे तपासणीतून धाव चाचणीकरिता पात्र ठरले. धाव चाचणीसाठी 31 गुणवत्ता यादीतील, तर 11 प्रतीक्षा यादीतील उमेदवार उपस्थित होते. मात्र, या अंतिम टप्प्यासाठीदेखील दोन उमेदवारांनी दांडी मारल्याने ते भरतीप्रक्रियेतून बाद झाले. धाव चाचणीचा निकाल जाहीर झाल्यावर काही प्रवर्गासाठी उमेदवारच मिळालेले नाही. दरम्यान, बॉटनी, झूलॉजी, पर्यावरणशास्त्र विभागाच्या पदवीधरांनादेखील या भरतीसंदर्भात अनास्था असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षकपदाच्या भरतीत नाशिकमधून एकही उमेदवार लेखी परीक्षेत पात्र न झाल्याने भरती रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती.  

वनरक्षक भरतीच्या धाव चाचणीनंतर 31 गुणवत्तायादी, तर 11 प्रतीक्षा यादीतील उमेदवार चाल चाचणीसाठी पात्र ठरले. यातील एक अनुकंपाचा उमेदवार आहे. मात्र, काही प्रवर्गांतील उमेदवार प्राप्त न झाल्याने अंतिम निकालानंतर काही जागा रिक्त राहतील.
- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक