Fri, Jun 05, 2020 04:05होमपेज › Nashik › नाशिकची मेट्रो सुसाट!

नाशिकची मेट्रो सुसाट!

Published On: Aug 29 2019 9:06AM | Last Updated: Aug 29 2019 9:06AM
मुंबई : प्रतिनिधी

नाशिक शहरात जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि.28) मंजुरी देण्यात आली. त्यात 33 किलोमीटर लांबीची मुख्य मार्गिका व 26 किलोमीटरची पूरक मार्गिका यांचा समावेश राहणार असून, या प्रकल्पात वीज व बॅटरी या दोन्ही ऊर्जास्रोतांचा वापर होणार असल्याने तो देशात अभिनव ठरणार आहे.

नाशिक हे राज्यातील वेगाने विकसित होणारे शहर असून, शहराच्या आजूबाजूच्या गावांची होणारी वाढ लक्षात घेता, राज्य शासनाने अत्याधुनिक सार्वजनिक परिवहन प्रणालीच्या (एमआरटीएस-मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम) स्वरूपात परवडणारी, प्रदूषणमुक्‍त व हरित, ऊर्जाप्रेरक व विश्‍वसनीय अशी सार्वजनिक परिवहन प्रणाली निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या सर्वसमावेशक वाहतूक व परिवहन आराखड्याआधारे तसेच शहरातील अरुंद, दाटीवाटीच्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन मेट्रो ही सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था विकसित केली जाणार आहे. नाशिक मेट्रोच्यला प्रस्तावानुसार, दोन मुख्य मार्गिकांवर वीज आधारित मेट्रो यान चालविण्यात येतील. यामध्ये गंगापूर ते नाशिकरोड रेल्वेस्थानक ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक 1 असेल. तिची लांबी 22.5 किमी राहणार असून, त्यामध्ये 20 स्थानके असतील. तर गंगापूर ते मुंबई नाका ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक 2 राहणार असून, तिची लांबी 10.5 किमी असेल व त्यात 10 स्थानके असतील.

या दोन मुख्य मार्गिकांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा 11.5 किमी आणि नाशिक स्थानक-नांदूरनाका मार्गे शिवाजीनगर असा 14.5 किमी असा एकूण 26 किमीचा पूरक मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. या पूरक रस्त्यांवर बॅटरीवर धावणारे मेट्रो यान चालविण्यात येतील. पूरक मार्गांमुळे मुख्य मेट्रो मार्गांवर पोहोचणे नागरिकांना सुलभ होईल. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 2,100 कोटी इतका आहे. या प्रकल्पाचे गेल्या 22 जुलै रोजी नाशिक महापालिकेत पदाधिकार्‍यांसमोर सादरीकरण करण्यात आले होते. 

महामेट्रोतर्फे अंमलबजावणी

या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्‍त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) या विशेष उद्देशवहन कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पात राज्य शासन, केंद्र शासन, नाशिक महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी यांचा आर्थिक सहभाग राहणार आहे.