Wed, Aug 12, 2020 03:46होमपेज › Nashik › महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज, पाथर्डी फाट्यावर गर्दी

महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज, पाथर्डी फाट्यावर गर्दी

Published On: Sep 18 2019 4:56PM | Last Updated: Sep 18 2019 5:16PM
सिडको : प्रतिनिधी

भाजपाच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नाशिक पाथर्डी फाटा येथे हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि नागरिक गर्दी करुन उभे आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी ढोल-ताशांचे पथक या ठिकाणी दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिक्षेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक आहेत.

महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा ते सिडको परिसरातील रस्त्याच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी सिडकोत उत्तमनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौकात हजारो नागरिक गर्दी केली आहे. पाथर्डी फाटा येथे महाजनादेश यात्रेचा रथ दाखल झाला आहे. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाथर्डी फाटा येथे भेट देऊन रथाची तपासणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास  तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  

यात्रेच्या पुढे महिला व पुरुष यांची मोटरसायकल रॅलीही काढण्यात येणार आहे. दरम्यान, स्वागतासाठी नागरिक मोठया संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभी असल्याचे दिसून येत आहे. तर कार्यकर्त्यांच्या हातात भाजपचे झेंडे झळकत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस मुंबई येथुन नाशिककडे रवाना झाले आहे. ते पाथर्डी फाटा येथे कधी येतात याचीच सर्वांना उत्सुकता आहे.