Wed, Jun 03, 2020 09:32होमपेज › Nashik › सिडकोमध्ये भरदिवसा युवकाचा भोसकून खून

सिडकोमध्ये भरदिवसा युवकाचा भोसकून खून

Published On: Feb 09 2019 1:43AM | Last Updated: Feb 09 2019 12:04AM
सिडको : प्रतिनिधी

परिसरातील शुभम पार्क भागात शुक्रवारी (दि.8)  सायंकाळी गणेश जयंती कार्यक्रमासाठी हॅलोजन खरेदीसाठी आलेल्या एका युवकावर दोघांनी वर्दळीच्या ठिकाणी चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या झालेल्या भांडणातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या खुनामुळे या भागातील गुंडगिरीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वैभव विजय गांडोळे (23, रा. शुभम पार्क, सिडको) हा त्याचा मित्र निखिल सोनवणे याच्यासोबत दुचाकीवर शुभम पार्क येथे गणेश जयंतीच्या कार्यक्रमासाठी लागणारे हॅलोजन घेण्यासाठी दुपारी साडेचारच्या दरम्यान एका दुकानात आला. यावेळी संशयित आरोपी शुभम पेंढारे व त्याचा मित्र हे दोघे दुचाकीने त्याचा पाठलाग करत होते. वैभव हा शुभम पार्क येथे पोहोचला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर दोघा संशयितांपैकी एकाने चाकू वैभवच्या पोटात भोसकून दोघेही फरार झाले. वैभव काही वेळ येेथे पडून होता. त्यानंतर नागरिकांनी त्याला उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचे निधन झाले होते असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर शुभम पार्क भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी शुभम पेंढारे समावेत एकावर खुनाचा गुन्हा  दाखल केला आहे. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्‍त शांताराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी पोलिसांनी घटनेतील चाकू जप्त केला आहे. दरम्यान, या भागातील गुंडगिरीचा प्रश्‍न पुन्हा या घटनेमुळे समोर आला असून, पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात अशी नागरिकांनी मागणी केली आहे. वैभवच्या पश्‍चात आई-वडिल व भाऊ असा परिवार आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे तपास करीत आहेत.