Tue, Jul 07, 2020 17:13होमपेज › Nashik › उद्योजकांकडे मालेगावची शिफारस 

उद्योजकांकडे मालेगावची शिफारस 

Published On: Jun 15 2019 1:50AM | Last Updated: Jun 15 2019 12:31AM
मालेगाव : प्रतिनिधी

औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून मालेगावच्या आर्थिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सायनेतील टप्पा क्रमांक-दोनमध्ये उद्योग उभारणीसाठी 300 उद्योजकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. तर, देश व राज्यपातळीवरून उद्योग विस्तारासाठी माफक दरातील जमीन शोधणार्‍या उद्योजकांना मी आता मालेगावची शिफारस करेल, अशी ग्वाही राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मालेगाव आद्योगिक क्षेत्र टप्पा -2 सायने व टप्पा तीन अजंग-रावळगावमधील भूखंड नोंदणीचा शुभारंभ केल्यानंतर सटाणा रोडवरील यशश्री कम्पाउंडमध्ये आयोजित उद्योजक परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर शेख रशीद, आमदार आसिफ शेख, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आदी उपस्थित होते.

कापूस उत्पादन क्षेत्रातच वस्त्रोद्योग विकसित करण्याचे शासन धोरण निश्‍चित आहे. त्याअंतर्गत पहिला टेक्स्टाइल पार्क अमरावतीत झाला असून, त्याचा दुसरा टप्पा मालेगावमध्ये होत आहे. त्यासाठी अजंग-रावळगावमधील सुमारे 863 एकरांवर नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहतीत एकाच वेळी रस्ते, वीज आणि पाणी आदी सर्व पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. दुसरीकडे तरुणांच्या कौशल्यवाढीसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल, मालेगाव डी प्लस झोनमध्ये असल्याने कमी दरात वीज उपलब्ध होईल. त्यामुळे मोठ्या उद्योजकांनी नवीन प्रकल्प उभारणीसाठी पुढे येण्याचे आवाहन उद्योगमंत्री देसाई यांनी केले. विकासाचा अनुशेष भरून काढत मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारा जागरूक नेता म्हणून त्यांनी राज्यमंत्री भुसे यांचा शब्दगौरव केला.

राज्यमंत्री भुसे यांनी सायने, अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीच्या वाटचालीचा आढावा सादर केला. काही वर्षांपूर्वी सायने ते झोडगेपर्यंतची 10 हजार एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी मिळविताना आलेल्या अनुभवातून शासनाचीच जमीन ‘एमआयडीसी’साठी मिळण्याची गरज लक्षात आली. तालुक्याच्या द‍ृष्टीने मोसम-गिरणा नदीबरोबरच शेती महामंडळाची पाच हजार 200 एकर जमीन ही जमेची बाजू ठरली. सर्वोच्च न्यायालयाने खंडकरी शेतकर्‍यांबाबत महत्त्वपूर्ण निवाडा केला. ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी मिळविण्याचा पाठपुरावा केला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी दि. 27 जुलै 2017 ला यश आले. 345 हेक्टर क्षेत्र एमआयडीसीकडे हस्तांतरित झाले. तेही केवळ 34.18 कोटीत. त्यामुळे भूखंडांचे दर मर्यादेत ठेवण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील  यांनी प्रास्ताविक केले. तर तरुण उद्योजक अलिम फैजी व ममता लोढा यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक बंडुकाका बच्छाव, सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय दुसाने, माजी आमदार शरद पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, भाजयुमाचे लकी गील, नीलेश कचवे उपस्थित होते.