Tue, Jun 15, 2021 13:09
ब्रेक फेल : बसचालकानं प्रसंगावधान राखत २२ प्रवाशांचे वाचवले प्राण!

Last Updated: Jun 10 2021 9:40PM

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

ऐन सिग्नलवर अचानक ब्रेक फेल झालेल्या बसवर नियंत्रण मिळवत चालकाने रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर बस आल्हादपणे धडकवली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि सुमारे २२ प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच, सिग्नलवर उभे असलेल्या वाहनचालकांनादेखील वाचविले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून बस व भिंतीचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी पंचवटीतील तारवाला नगर सिग्नलवर घडली.

गुरुवारी (दि.१०) दुपारी पावणे चारच्या सुमारास सीबीएस बसस्थानकातून दिंडोरीरोडमार्गे खुंटविहारकडे निघालेली एसटी बस (क्र. एम एच १४ बी टी ३७६१) तारवालानगर य सिग्नलजवळ पोहोचली. यावेळी चालक टी. टी. पगार यांनी ब्रेक मारला मात्र ब्रेक न लागल्याने ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत बस थेट जलसंपदा विभाग, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीवर घातली. सिग्नल लागलेला असल्याने बसचा वेगही कमी होता. त्यामुळे बस  अलगदपणे टेकवल्याने बसमधील २२ प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र यात बसचे नुकसान झाले असून, सुरक्षा भिंत तुटली आहे.

हँम्पमुळे मोठा अपघात टळला

तारवालानगर सिग्नलवर नेहमी अपघात होतात.परंतु या वाढत्या घटना बघता प्रभाग ४ चे नगरसेवक जगदीश पाटील यांनी पाठपुरावा करून या सिग्नलवर चारही बाजूंना हँम्प बसविले. तेव्हापासून अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. आजदेखील हँम्पमुळेच बसचा वेग कमी झाला होता, त्यामुळेच चालकाला बसवर नियंत्रण मिळविणे, शक्य झाले, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.