Wed, Jun 03, 2020 20:32होमपेज › Nashik › शाखा अभियंत्यावर लाच प्रकरणी गुन्हा

शाखा अभियंत्यावर लाच प्रकरणी गुन्हा

Published On: Jul 20 2019 2:13AM | Last Updated: Jul 20 2019 2:13AM
नाशिक : प्रतिनिधी

लघुपाटबंधारे विभागातील लाचखोर शाखा अभियंत्याविरोधात सटाणा पोलिसांमध्ये शुक्रवारी (दि.19) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राजू पुणा रामोळे असे गुन्हा दाखल झालेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.

सटाणा तालुक्यातील जाखेडा धरणातून गाळ काढण्याच्या मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी डॉ. रामोळे याने तक्रारदाराकडे 13 जून 2019 रोजी 15 हजारांची लाच मागितली होती. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयात सापळा रचला होता. मात्र, सापळापूर्व पडताळणीत डॉ. रामोळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी अथवा कर्मचार्‍यांकडून तसेच खासगी व्यक्तींकडून लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात आले आहे.