Fri, May 29, 2020 10:00होमपेज › Nashik › भुसावळ : गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

भुसावळ : गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

Published On: Jul 14 2019 4:23PM | Last Updated: Jul 14 2019 4:23PM
जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर दोघांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना खडका रोड चौफुली येथे घडली होती. या प्रकरणी एलसीबी पथकाने दोघांना कालिकामाता चौकातून अटक केली. त्यांना बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, खलील अली मोहम्मद शकील (वय २५ रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुपारी गेला होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खडका रोड चौफुलीवरून तो परतत असताना खुशाल बोरसे हा खलील याला चॉपरने मारण्यासाठी धावला. त्याचा वार चुकल्याने त्याने आपल्याजवळील गावठी पिस्तूल मयूरला देत त्याला गोळ्या झाडण्यास सांगितले. त्यानुसार मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे (रा.जळगाव) याने बंदूक हातात घेऊन तीन गोळ्या हवेत, तर दोन गोळ्या जमिनीवर झाडल्या. यासोबत दोन गोळ्या खलीलच्या डाव्या हाताच्या दंडावर झाडल्याने तो जखमी झाला. 

त्याला जखमी अवस्थेत नातेवाइकांनी तातडीने खासगी वाहनाने भुसावळहून जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यानंतर दोन्ही आरोपी पळून गेले होते. मात्र, एलसीबीच्या पथकाला दोन आरोपीना पकडण्यात यश आले. दरम्यान, फिर्यादी आणि दोन्ही आरोपी हे गुन्हेगारी वृत्तीचे असून पैशांच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.