Fri, Jun 05, 2020 17:21
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नगरसेविका पुत्रासह नगरसेवकाची चौकशी

नगरसेविका पुत्रासह नगरसेवकाची चौकशी

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:44PM

बुकमार्क करा
सिडको : प्रतिनिधी

बॉश कंपनीतील चोरी व बनावट साहित्य विक्री प्रकरणात संशयावरून अंबड पोलिसांनी नगरसेविका पुत्रासह एका नगरसेवकाची पाच ते सहा तास कसून चौकशी केली. दरम्यान, मुख्य संशयिताला कंपनीत नेवून पोलिसांनी चोरी करण्याची पद्धत जाणून घेतली. संशयितांच्या घराचीही झडती घेण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

बॉश कंपनीच्या या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच काही राजकीय व्यक्‍तींचा सहभाग असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी मुख्य संशयिताला अटक केल्यानंतर बुधवारी (दि.10) नगरसेविका पती बाळा दराडे यांची चौकशी करण्यात आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. गुरुवारी (दि.11) नगरसेवक मुकेश शहाणेसह शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांचे चिरंजीव सचिन राणे यांची चौकशी करण्यात आली.

त्याचबरोबर यातील मुख्य संशयित आरोपी ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी उर्फ छोटू चौधरी यास बॉश कंपनीत नेवून त्याठिकाणाहून या मालाची ने-आण कशा पद्धतीने केली जायची याची माहिती पोलीसांनी जाणून घेतली. तसेच छोटू चौधरी याच्या पखाल रोडवरील घराचीही झडती घेण्यात आली. आत्तापर्यंत तिघा राजकीय व्यक्‍तींची पोलिसांनी चौकशी केली असली तरी अजूनही कोणाचा यात सहभाग आहे की नाही याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

सदर प्रकरणात सातपूर परिसरातीलही एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे बोलले जात असून, पोलीस प्रशासन आता याचीदेखील चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बॉश कंपनीतील स्क्रॅप मटेरियल विभागातून अन्य मालाबरोबरच हा मालही महिनाभरात लंपास करण्यात आल्याचे छोटू चौधरीने सांगितलेे. या प्रकरणात राजकीय व्यक्‍तींव्यतिरिक्त अन्य कोणाचाही सहभाग होता का, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे, असे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी म्हटले आहे.