Fri, May 29, 2020 09:54होमपेज › Nashik › देवळाली कॅम्प येथे बिबट्याची दहशत

देवळाली कॅम्प येथे बिबट्याची दहशत

Last Updated: Oct 13 2019 11:44PM
सर्वतीर्थ टाकेद : वार्ताहर

देवळाली कॅम्प परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने चार ठिकाणी हल्ला चढवत कुत्र्यांची शिकार केली आहे. शनिवारी (दि.12) मध्यरात्री देवी मंदिर परिसरातील रेस्ट कॅम्प रोडवरील पंचदीप रेणुकामाता सोसायटीत कुत्र्यांची शिकार करू पाहणार्‍या बिबट्याला मात्र कुत्र्यांनीच पळवून लावले.

देवळाली कॅम्पला जंगल कमी होऊन सिमेंटचे जंगल वाढीस लागल्याने वन्य प्राणी शहरी भागाकडे भक्ष्याच्या शोधात येत आहेत. काही दिवसांपूर्वी बार्न्स स्कूल रोडलगत एका बंगल्यात बिबट्याने त्याला जखमी केल्याची घटना घडली होती. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास बलकवडे यांच्या घराजवळ बिबट्याने  त्यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला, परंतु प्रशिक्षित असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला न घाबरता धैर्याने त्याचा मुकाबला करत त्याला पिटाळून लावले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. तेथून धूम ठोकताना बिबट्याच्या डरकाळीने परिसरात घबराट निर्माण झाली. या परिसरातून मोठा नाला जात असून, या जाणार्‍या नाल्याचा वन्यप्राणी वापर करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. 

लष्करी परिसर असल्याने तिथे संरक्षक भिंत नसल्याने बिबटे थेट मानवी वस्तीत पोहोचत आहेत. गेल्या पंधरवड्यापासून दोन किलोमीटर परिसरात बिबट्याने घातलेला धुमाकूळ लक्षात घेता, हा बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वी त्याला जेरबंद करण्याची मागणी संजय बलकवडे, राजेश बलकवडे, राजेंद्र बलकवडे, शैलेश पगारे यांनी केली आहे.