Tue, Jun 02, 2020 12:33होमपेज › Nashik › ‘ठाकरे’ चित्रपटासाठी भुजबळांचा खास शो

‘ठाकरे’ चित्रपटासाठी भुजबळांचा खास शो

Published On: Feb 09 2019 1:43AM | Last Updated: Feb 08 2019 11:51PM
नाशिक : प्रतिनिधी

एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले छगन भुजबळ कालांतराने शिवसेनेपासून दूर झाले असले तरी भुजबळ मात्र मनाने मातोश्रीशीच जवळीक ठेवून असल्याचे प्रत्यय अनेकदा आले आहेत. आताही शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘ठाकरे’ चित्रपटासाठी भुजबळांनी नाशिकला खास शोचे आयोजन केले आहे. यामागे येत्या लोकसभा निवडणुकीमागील काही डावपेच आहे की काय अशी शंकाही यानिमित्ताने येते.   

कधीकाळी छगन भुजबळ हे शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जात. याच निष्ठेमुळे भुजबळांना शिवसेनेचे मुंबईचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. केवळ महापौरच नव्हे, तर भुजबळांना शिवसेनेत आपले एक खास स्थान निर्माण केले होते. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून भुजबळांकडे पाहिले जायचे. परंतु, राजकारण आणि ओबीसी मंडल आयोगाचे निमित्त आड आले आणि भुजबळांनी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला. असे असले तरी आजही भुजबळ मात्र ठाकरे कुटूंबियांशी जवळीक साधून आहेत. गेल्या महिन्यात मनसे प्रमूख राज ठाकरे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला भुजबळ कुटूंब उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यानंतर काही दिवसांनी भुजबळांनी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यासमवेत राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवरही आपली हजेरी लावली. यामुळे भुजबळ अजूनही ठाकरे कुटूंबियांच्या संपर्कात असल्याचे समोर येते. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती होते की नाही याविषयी अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. इकडे नाशिक मतदार संघासाठी माजी खासदार समीर भुजबळ पुन्हा इच्छूक आहे. यामुळे धाकल्या भुजबळांना निवडणुकीत मदत व्हावी म्हणूनही कदाचित ठाकरे चित्रपटाचा खास शो ठेवला गेला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महाराष्ट्रासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाईक, बॅ. ए. आर. अंतुलेंपासून तर शरद पवार व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्यपणाला लावले.  त्यांच्या या कार्याचा प्रवास ठाकरे या चित्रपटाद्वारे जनतेच्या समोर मांडण्यात आला आहे.