Mon, Nov 18, 2019 13:43



होमपेज › Nashik › भुजबळ येवल्यातून अपक्ष उभे राहणार का? - शिंदे

भुजबळ येवल्यातून अपक्ष उभे राहणार का? - शिंदे

Published On: Sep 06 2019 1:44AM | Last Updated: Sep 05 2019 11:33PM




येवला : प्रतिनिधी

भुजबळांच्या घरवापसीच्या चर्चांना फुल्ल हवा मिळत असताना भुजबळ मात्र सेना प्रवेशासंदर्भात काहीही उघडपणाने बोलत नाही, तर स्थानिक शिवसेना येवला शहर पदाधिकारी मात्र भुजबळांना सेनेत या, असे साकडे घालत आहे. दुसरीकडे भुजबळ अपक्ष लढणार का, असा सवाल राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीर पत्रकाद्वारे केला आहे. यापूर्वीही माणिकराव शिंदे यांनी जाहीर पत्राद्वारे भुजबळांऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.

2004 मध्ये भुजबळांना येवल्यात आणणारे माणिकराव शिंदे यांनी 2009 मध्ये भुजबळांविरुद्ध उमेदवारी करीत रणशिंग पुकारले होते. त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी राष्ट्रवादीत राहूनच शिंदे यांनी भुजबळांना खुले आव्हान दिले आहे. आमदार भुजबळ यांनी बुधवारी (दि.4) येवला-लासलगाव मतदारसंघाच्या दौर्‍यावर असताना येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले. परंतु, कोणता पक्ष हे जाहीररीत्या सांगितले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या निवडणुकी संदर्भातील बैठकांना आमदार छगन भुजबळांनी उपस्थित असणे आवश्यक होते. तथापि, भुजबळ यांनी वेगवेगळे कारण पुढे करीत सदरच्या बैठकांना गैरहजर राहिले. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौर्‍यातही स्वतः अनुपस्थित राहिले. या सर्व घटनाक्रमाचा आढावा घेतला तर भुजबळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असल्याचे वातावरण स्वतःच तयार केले. तर दुसरीकडे शिवसेना प्रवेशाची वातावरण निर्मिती करत राहिले. बुधवारच्या येवला दौर्‍यातही शिवसेनेबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिवसेना प्रवेशाच्या वातावरणाला हवा दिली, असा आरोप शिंदे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.