होमपेज › Nashik › भुजबळ, महाले, कोकाटेंचे अर्ज दाखल

भुजबळ, महाले, कोकाटेंचे अर्ज दाखल

Published On: Apr 10 2019 2:01AM | Last Updated: Apr 09 2019 11:34PM
नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी-काँग्रेस-आरपीआय (कवाडेगट) महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मंगळवारी (दि.9) नाशिक लोकसभा मतदारसंघातून तर धनराज महाले यांनी दिंडोरीमधून नामनिर्देशन अर्ज दाखल केले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शक्‍तिप्रदर्शन टाळून साध्या पद्धतीने दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले. विशेष म्हणजे यावेळी मनसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान,  माणिक कोकाटे, अपक्ष करण गायकर, सीमंतिनी कोकाटे यांच्यासह इतरांनीदेखील आज अर्ज दाखल केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, रिपाइंचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह इतर प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दिंडोरीमधून महाले यांचे चिरंजीव वैभव महाले यांनीही पूरक अर्ज दाखल करून ठेवला. 

यावेळी शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नीसह आदिवासी कुटुंब तसेच खेळाडूंना सोबत घेत अर्ज दाखल करण्यात आले. नाशिकमधून मंगळवारी समीर भुजबळ (राष्ट्रवादी), शेफाली भुजबळ, माणिक कोकाटे (अपक्ष), अ‍ॅड. वैभव अहिरे, विलास देसले, प्रियंका शिरोळे, शरद धानराव, सीमंतिनी कोकाटे, शरद आहेर, सोनिया जावळे, शत्रुघ्न झोंबाड, राजू कटाळे, विष्णू जाधव, रंगा सोनवणे, महेश ढगे, सिंधुबाई केदार, भीमराव पांडवे, संजय घोडके, शिवनाथ कासार व शिवाजी वाघ आदींनी अर्ज दाखल केले. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी (दि.9) 11 उमेदवारांनी एकूण 14 अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपाच्या भारती पवार यांच्यासह त्यांचे पती प्रवीण पवार यांनी अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांनी (2) व वैभव महाले, अशोक जाधव (बसपा), दादासाहेब पवार (अपक्ष), हेमराज वाघ (अपक्ष), भारतीय ट्रायबल पक्षाचे दत्तू बर्डे यांनी एक तर बाबासाहेब बर्डे यांनी दोन अर्ज, शिवाजी मोरे (राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी), बापू बर्डे (वंचित 
बहुजन आघाडी) यांनी दोन अर्ज दाखल केले. नाशिकमधून एकूण 30 उमेदवारांनी 41 तर दिंडोरी मतदारसंघातून 15 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. 

उमेदवाराची काढली समजूत

शत्रुघ्न तुकाराम झोंबाड हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात गेले. यावेळी अनामत रक्कम मदतनीसाला आतमध्ये घेण्याची मागणी झोंबाड यांनी केली. परंतु, त्याला आत न घेतल्याने झोंबाड यांनी जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. अखेरीस सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद संपुष्टात आला. 

पोलिसांच्या दादागिरीचा कार्यकर्त्यांना फटका

जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्‍त करण्यात आलेल्या पोलिसांचा उमेदवारांसह सर्वसामान्यांना फटका बसला. अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश देताना पोलिसांनी अडवले. यावेळी कोकाटे व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. दरम्यान, सर्वसामान्यांना कार्यालयाच्या परिसरात सन्मानपूर्वक प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या. असे असतानाही पोलिसांकडून मात्र, नागरिकांची अडवणूक केली जात होती. जिल्हाधिकारी कार्यालयाचे टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनच्या बॅगेची व त्यांची स्वत:ची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आत धाडले. एकूणच कार्यालयात नियुक्त केलेल्या पोलिसांच्या दादागिरीला सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागले. 

अनामत म्हणून आणली दहा हजारांची चिल्लर

नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी अनामत भरण्यासाठी 10 हजार रुपयांची चिल्लर आणली होती. अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 वाजता अंतिम मुदत असताना अर्धा तास आधी म्हणजेच अडीच वाजता वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात प्रवेश केला. अनामत म्हणून आणलेली रक्कम चिल्लर असल्याने ती तपासून मगच भरावी, अशा सूचना अधिकार्‍यांनी वाघ यांना दिल्या. त्यावर वाघ यांनी दालनातच ठाण मांडत चिल्लर मोजण्यास सुरुवात केली. अखेरीस साडेतीन ते चारच्या सुमारास वाघ यांचा अर्ज भरून घेण्यात आला. परंतु, या सर्व घडामोडीत प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.