Tue, Nov 19, 2019 03:45होमपेज › Nashik › 'भोजापूर' ओव्हरफ्लो, बिगरसिंचन आवर्तनाचा मार्ग मोकळा 

सिन्नर : भोजपूर धरण ओव्हरफ्लो

Published On: Aug 02 2019 1:18PM | Last Updated: Aug 02 2019 1:18PM
सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण आज (दि.२) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच परिसरातील २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. 

म्हाळुंगी नदीवरील या धरणाची ३६१ दलघफू एवढी साठवण क्षमता आहे. नदीच्या उगमस्थानी गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणात पाण्याची चांगली आवक झाली. उंबरदरी, कोनांबे आणि बोरखिंड ही धरणे यापुर्वीच भरली आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सिन्नर तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान भोजापूर धरणावरुन मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ६ गावे अशा दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असतात. 

भोजापूर पूरचरच्या माध्यमातून पूर्व भागातील दहा ते बारा गावे लाभक्षेत्रात येतात. या गावांच्या परिसरात अद्याप पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पूरचऱ्यांना बिगरसिंचन आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आ. राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पूरचाऱ्यांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.