Fri, May 29, 2020 08:37होमपेज › Nashik › केंद्राने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, १० टक्के आरक्षणाचा फायदा मुस्लिमांनाच : आंबेडकर

केंद्राने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, १० टक्के आरक्षणाचा फायदा मुस्लिमांनाच : आंबेडकर

Published On: Jan 13 2019 7:58PM | Last Updated: Jan 13 2019 11:24PM
नाशिक : प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत वंचित समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लोकशाही टिकविण्यासाठी आणि सुद‍ृढ ठेवण्यासाठी वंचितांच्या प्रतिनिधींची गरज आहे. वंचित समाजाने एकमेकांना मदत करून आघाडीचा उमेदवार विजयी करावा. प्रत्येक वंचिताने सत्ता घेण्याचा निर्धार करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

गोल्फ क्‍लब मैदानावर झालेल्या वंचितांची सत्ता महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर  आमदार इम्तियाज जलील, बळीराम शिरसकर, माजी आमदार लक्ष्मण माने, हरिदास भदे, डॉ. दशरथ भांडे, अशोक सोनोने, अमित भुइंगळ, दिशा पिंकी शेख, अ‍ॅड. झुंजार आव्हाड, जावेद मुन्शी, किशोर ढमाले, किसान चव्हाण, पवन पवार, डॉ. संजय जाधव आदी उपस्थित होते.  केंद्र सरकारने आर्थिकद‍ृष्ट्या मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या आरक्षणामुळे शिक्षण, व्यापार, कारखानदार, शासकीय अधिकारी आदी क्षेत्रातील हिंदू सवर्ण बाद होणार आहे. त्यामुळे दहा टक्के आरक्षणाचा फायदा केवळ मुस्लिम समाजाला होईल. आरक्षणाचा निर्णय म्हणजे भाजपाने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारल्याचा प्रकार असल्याचे  अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. 

प्लास्टिक मनीचा वापर करण्यासाठी पंतप्रधानांनी अमेरिकेतील डेबिट कार्ड आणि के्रडिट कार्ड कंपन्यांसोबत करार केला होता. या करारानंतरच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. नोटाबंदी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अथवा दहशतवाद्यांची रसद तोडण्यासाठी नव्हती. आता संबंधित कंपन्या करारनाम्याची माहिती जाहीर करण्याची धमकी देऊन मोदींना ब्लॅकमेल करत आहे. ब्लॅकमेल होणार्‍या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.

हवाईदलाला 126 विमानांची आवश्यकता असताना मोदी सरकारने केवळ 36 विमाने खरेदी केली. या विमानांच्या वापराबाबतचा करार फ्रान्ससोबत झालेला नाही. त्यामुळे सदरची विमाने धूळ खात पडण्याची शक्यता आहे. काँगे्रसला मुस्लिमांची मते चालतात; पण नेते चालत नाही. 169 कुटुंबांकडे आजवर सत्ता राहिली आहे. या कुटुंबांकडून सत्तामुक्ती केल्यास शेतकरी आत्महत्यासारखे प्रश्‍न सुटतील. तर सेना-भाजपाची युती तुटणार नसल्याचे भाकित अ‍ॅड. आंबेडकर यांनी वर्तविले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगाराची स्वप्ने दाखविली. ते स्वप्न पूर्ण तर केले नाही. मात्र, बेरोजगारांना पकोडे पकवण्याचा सल्ला मोदी देत आहेत. सरकारने काळा पैसा आणण्यासोबतच 15 लाख रुपये खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन दिले. तेदेखील पूर्ण केले नाही. चार वर्षांत फक्‍त उद्योगपतींनाच मोठे करण्याचे काम सरकार करीत आहेत. त्यामुळे मोदी सरकारची घरवापसीची वेळ आली आहे. त्यामुळे 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला विजयी करा, असे आवाहन आ. इम्तियाज जलील यांनी केले. 

देशाला बुडवू नका : हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला बुडवू नका. हिंदू राष्ट्र बनले काय नाही बनले काय याचा परिणाम होत नाही. भाजपा सरकारकडून रिझर्व्ह बँकासारख्या बँका बुडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू राष्ट्रासाठी आग्रह धरणारे राष्ट्रभक्त असल्याचे सांगत सुटल्याची टीका आंबेडकर यांनी केली.