Fri, Jun 05, 2020 17:52होमपेज › Nashik › काँग्रेसचे ३३ वर्ष खासदार राहिलेल्या माणिकराव गावितांचे चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करणार

काँग्रेसचे ३३ वर्ष खासदार राहिलेल्या माणिकराव गावितांचे चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करणार

Published On: Jul 02 2019 5:02PM | Last Updated: Jul 02 2019 4:33PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

काँग्रेसचे ३३ वर्षे खासदार राहून रेकॉर्ड करणारे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत माणिकराव गावित हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील आणखी महत्वाचे नेते भाजपाच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते येत्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. याबाबतचे संकेत त्यांनी स्वतःच आज (ता.२) मंगळवारी दिले. शिवाय स्थानिक काँग्रेस नेत्यांना त्रासातूनच आपण काँग्रेस सोडल्याचा जाहीर खुलासा त्यांनी यावेळी केला. भरत गावित यांच्या भाजप प्रवेशाने नंदुरबार जिल्हा काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

१९८१ ते २००९ पर्यंत सलग नऊवेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांना मोदी लाटेमुळे २०१४ साली पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे यंदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी वयाचे कारण देत माणिकराव यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हा माणिकराव यांचे पूत्र तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी, असा आग्रह पक्षाकडे धरला होता. आपल्या मागणीचा विचार होत नसल्याचे पाहून भरत गावित यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. 

परंतु काँग्रेस पक्षाने आमदार अँड.के.सी.पाडवी यांना घोषित केलेली उमेदवारी तशीच ठेवत भरत गावित यांची समजूत काढून शांत बसवले होते. तथापि आज मंगळवार (दि. २ जुलै) रोजी भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भरत माणिकराव गावित हे स्वतः उपस्थित होते. 

यावेळी भरत गावित पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्षासाठी संपूर्ण हयात घालवली असताना काँग्रेसने माणिकराव गावित यांची मागणी मान्य केली नाही. याचे दुःख अनेकांना आहे. उलट लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत आम्हाला एकही जबाबदारी न देता स्थानिक काँग्रेस नेत्यांनी वाळीत टाकले होते. आमचा रोष काँग्रेस नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि त्यांचे पूत्र शिरीष नाईकांवर आहे. त्यांनी अनेकदा आम्हाला संकटात टाकले असल्याचा स्पष्ट आरोप भरत गावित यांनी यावेळी केला. या नाईक पिता पुत्राच्या त्रासाला कंटाळूनच आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. आता लवकरच भाजपाचे नेते ठरवतील त्या दिवशी आमचा प्रवेशसोहळा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत मी नवापूर विधानसभा मतदार संघातून भाजपातर्फे उमेदवारी करायला इच्छूक असून भाजपा नेत्यांकडे तशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.