Tue, May 26, 2020 13:07होमपेज › Nashik › बंगाली घुसखोर नांदगाव पोलिसांच्या जाळ्यात

बंगाली घुसखोर नांदगाव पोलिसांच्या जाळ्यात

Published On: Jan 28 2019 8:38PM | Last Updated: Jan 28 2019 8:38PM
नांदगाव : प्रतिनिधी 

पिंपरी हवेलीचा आठवी पास झालेला कथित बंगाली डॉक्टर रतन तरूण चक्रवती बांगलादेशाचा नागरिक निघाल्याचे नांदगाव पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. याप्रकरणी चक्रवती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक (मनमाड) रागसुधा यांनी दिली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत सुनावली आहे. 

बांगलादेशी दलालाच्या माध्यमातून २००९ मध्ये त्याने भारतात प्रवेश केला. त्यानंतर तो नांदगाव तालुक्यात पिंपरी हवेली येथे स्थायीक होऊन कपड्याचा व्यवसाय करत होता. दरम्यान त्याने बंगाली डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळविली. पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र खोटेपणाने प्राप्त केले. या कागद पत्रांच्या आधारे बांगलादेशी ही मूळ ओळख लपवून त्याने भारतीय पासपोर्ट मिळविला.

त्यानंतर रतन चक्रबोती भारतीय नागरिक म्हणून बांगलादेशात जाण्यासाठी निघाला असता. हरदासपूर (प. बंगाल) येथील मुख्य इमिग्रेशन अधिकारी यांना त्याची कागदपत्रे तपासताना त्याची आई यापूर्वी भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला आहे. येथेच त्याचा पर्दाफाश झाला. इमिग्रेशनच्या तल्लख अधिकाऱ्याने हे कोडे सोडवले. रतनच्या पासपोर्टवर असलेल्या माहितीमध्ये तुलू चक्रबोती हे त्याच्या आईचे नाव होते. तुलू हे नाव यापूर्वी भारतात बांगलादेशी पासपोर्ट वर येऊन गेलेल्या बांगलादेशी महिलेचे आहे. हे लक्षात आल्याने हरिदासपुरच्या अधिकाऱ्यानी रतनचा पासपोर्ट रद्द करून वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवली आणि नांदगावचे पोलिस या तोतया नागरिकाच्या घरी पोहोचले. दरम्यान जेमतेम आठवीपर्यंत शैक्षणिक मजल मारलेल्या रतनने डॉक्टर (बंगाली) म्हणून पिंपरी हवेली परिसरात मान्यता मिळविली होती. याचा प्रत्यय त्याला ताब्यात घेतांना झालेल्या स्थानिक नागरिकांच्या विरोधातून आला.

भारतीय पासपोर्ट मिळविताना उपरोल्लिखित ओळखपत्रे सादर केल्याने व त्याच्या नावावर गुन्ह्याची नोंद नसल्याने तत्कालीन नांदगाव पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी त्याला ना हरकत दाखला दिला. अशी माहिती फिर्यादी पोलिस शिपाई पंकज देवकाते यांनी एफआयआरमध्ये दिली आहे. नमूद पासपोर्टच्या आधारे तो हरिदासपूर  मार्गे बांगला देशात जाण्याच्या तयारीत असतांना इमिग्रेशन अधिकारी यांच्या हुशारीमुळे तो पकडला गेला. पोलिस निरीक्षक अनिल भवारी, हवालदार रमेश पवार, पोलिस शिपाई पंकज देवकाते पुढील तपास करत आहेत.

बोगस डॉक्टरच्या सर्वेक्षणात रतन चक्रबोती आपल्या रडारवर आलाच नाही. तो वैद्यकीय प्रशिक्षण करतो याची माहिती नव्हती. तालुक्यात पाच बंगाली डॉक्टर्स आहेत. ते नेचरोथेरपी पद्धतीने उपचार करतात. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्यांच्याकडे औषधसाठा सापडला नाही. -डॉ. अशोक ससाणे.तालुका वैद्यकीय अधिकारी