Wed, Jan 27, 2021 09:33होमपेज › Nashik › जिल्हाधिकारी नरमले; बागलाणला टँकर मंजूर

जिल्हाधिकारी नरमले; बागलाणला टँकर मंजूर

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:57AMनाशिक : प्रतिनिधी

बागलाणमधील टंचाईग्रस्त चौगाव, किरमाने आणि गोराणे या तीन गावांना जिल्हाधिकार्‍यांनी टँकर मंजूर केले आहेत. पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने या तिन्ही गावांना मंगळवारपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामातील हे पहिलेच टँकर ठरले आहे. दरम्यान, येवल्यातील गावांना मात्र जिल्हाधिकार्‍यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.

जानेवारीच्या अखेरीस टंचाईच्या झळ सोसणार्‍या चौगाव, किरमाने आणि गोराणे ग्रामस्थांनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली होती. तसा प्रस्तावच स्थानिक प्रशासनामार्फत जिल्ह्याच्या मुख्यालयी पाठविण्यात आला होता. परंतु, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी टँकरच्या प्रस्तावावर स्वाक्षरीच केली नव्हती. परिणामी, टंचाई विभागात हे प्रस्ताव धुळखात पडून होते. दरम्यानच्या काळात गावकर्‍यांनी टँकर सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे रेटा लावला.

याची दखल घेत सरतेशेवटी जिल्हाधिकार्‍यांनी या तीन गावांना टँकर सुरू करण्याच्या प्रस्तावावर शनिवारी (दि.17) स्वाक्षरी केली. त्यामुळे गेल्या महिन्यापासून टंचाईचा सामना करणार्‍या या गावांतील ग्रामस्थांची तहान भागणार आहे. बागलाणला टँकर मंजूर करतानाच येवल्याच्या पूर्व पट्यातील आहेरवाडी, माळवाडी तसेच इतर दोन गावांच्या प्रस्तावाकडे जिल्हाधिकार्‍यांनी डोळेझाक केली आहे. परिणामी, या गावांना टँकरसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

अपयश झाकण्यासाठी सारे काही..!

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्‍त शिवारची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. परंतु, त्यातून अपेक्षित असा जलसाठा तयार झालेला नाही. यंदाही येवल्याचा पूर्व पट्टा, नांदगाव, चांदवडचा काही भाग, सिन्नर पूर्व पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या भागांत  टँकरची मागणी होत होती. मात्र लवकर टँकर सुरू केल्यास शासन दरबारी जिल्ह्यातील जलयुक्तचे अपयश उघड होईल. हे अपयश झाकण्यासाठीच जिल्हाधिकार्‍यांकडून उशिराने टँकरला मान्यता दिल्याची चर्चा आहे.